निर्भीडसत्ता.कॉम |
आपल्या महिला बचतगटांमधील स्त्रिया प्रामाणिकपणे जे काम करतात त्याला तोड नाही. त्यात त्यांची जिद्द दिसून येते. नाहीतर आजकाल मोठ्या मोठ्या कंपन्यादेखील बँकांकडून कर्ज घेऊन ती बुडवतात. पण महिला बचतगटांतील महिला त्यांच्या कर्जाची प्रामाणिकपणे परतफेड करतात. आपल्या आर्थिक बाबींमध्ये स्त्रियांचा जास्त हातभार असेल तर देश पुन्हा एकदा नक्कीच सोने की चिडीया बनू शकेल. लोकांच्या भल्याचा विचार करणा-या महेशदादा लांडगे यांच्या सारख्या लोकप्रतिनिधींच्या मागे आपण खंबीरपणे उभे राहणे हे आपले काम आहे, असे मत अॅक्सिस बॅंकेच्या उपाध्यक्षा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी इंद्रायणी थडी या ग्रामीण महोत्सवाच्या समारोप प्रसंगी व्यक्त केले.
भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीशी जोडणारा ‘इंद्रायणी थडी’ हा ग्रामीण महोत्सव भोसरीमधील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहाशेजारील गावजत्रा मैदानावर ८ ते ११ फेब्रुवारी दरम्यान भरविण्यात आला होता. त्याचा समारोप सोमवारी(११ फेब्रुवारी) झाला. यावेळी व्यासपीठावर आमदार महेशदादा लांडगे, सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ, महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, पूजा महेश लांडगे तसेच नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होत्या.
यावेळी पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, या जत्रेमुळे महिलांना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळणार आहे. आपण आता मोठा विचार करायला हवा. चांगले कौशल्य आत्मसात केले तर त्याला नक्कीच चांगली बाजारपेठ मिळेल. तुमच्या मनात प्रबळ इच्छा असेल तर यशाचे शिखर नक्की गाठता येईल. स्त्री ही अबला नसून सबला आहे. हिरकणीसारखी साधी स्त्री आपल्या बाळासाठी कोणत्याही अग्निदिव्याला सामोरी गेली. स्त्रिया प्रत्येक संकटाला धैर्याने तोंड देतात. येथे या कार्यक्रमात देशासाठी लढलेल्या शूर जवानांचा सन्मान करण्यात आला. खरे शूर हे जवान आहेत. आपण मात्र नटांनाच जास्त महत्व देतो. मुलगा आणि मुलगी या दोघांनाही समान संधी द्या. आपल्याला आपले विचार, मूल्ये कायम ठेवूनच आधुनिक बनायचे आहे.
सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ म्हणाल्या की, या कार्यक्रमात शौयाचा सत्कार करण्यात आला ही एक उत्तम गोष्ट झाली. वाईटाला संकटे नसतात, मात्र चांगल्याला नेहमी परीक्षा द्यावी लागते. महेशदादांनी ही एवढा मोठा कार्यक्रम भरवून स्त्रियांच्या कलागुणांना वाव दिला आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.
या समारोपाआधी फुलांनी सजवलेल्या, शिंगाना गुलाबी रंगांचे गोंडे बांधलेल्या, ऐटदार खिल्लारी जोडी असलेल्या बैलगाडीतून, ढोल ताशांच्या गजरात अमृता फडणवीस यांना कार्यक्रम स्थळी आणण्यात आले. केशरी रंगाचा हिरवा तुरा असलेला फेटा अमृता फडणवीस यांना बांधला होता.
बैलगाडीत बसण्याची इच्छा पूजाताईंनी पूर्ण केली
माझी लहान पणापासूनची बैलगाडीत बसण्याची इच्छा पूजा लांडगे यांनी पूर्ण केली. असे अमृता फडणवीस म्हणाल्या. यावेळी अमृता फडणवीस यांचा शिवांजली सखी मंचच्या वतीने भक्ती शक्ती शिल्प प्रतिकृती आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अमृता फडणवीस यांच्या हस्ते सिंधूताई सपकाळ यांना 51 हजारांचा धनादेश देण्यात आला. शुर सैनिकांचा आणि सहभागी बचत गटांचा सत्कार अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी खडकी येथील पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटरच्या बास्केटबॉलच्या राष्ट्रीय विजेत्या खेळाडूंचा ५१००० रुपयांचा धनादेश देऊन खास सत्कार करण्यात आला. तसेच किल्ले चढण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल गिरीजा धनाजी लांडगे हिचा अमृता फडणवीस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्तविक शिक्षण मंडळ सभापती सोनाली गव्हाणे यांनी केले. आभार आमदार महेशदादा लांडगे यांनी मानले. सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले.