निर्भीडसत्ता न्यूज –
गेल्या महिन्यात पिंपरी-चिंचवडमध्ये “आय लव्ह यु शिवडे…” असा मजकूर लिहून पोस्टरबाजी केल्याचा विषय जोरदार चर्चेत आला. त्यानंतर आता आणखी एक आश्चर्यकारक प्रकार निदर्शनास आला आहे. आता “स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा! 15 ऑक्टोबर” असा मजकूर लिहिलेले पोस्टर शहरात लावण्यात आले आहेत. आकुर्डी येथील खंडोबा माळ ते साने चौकापर्यंत ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजांना रोखण्याचे आव्हान महापालिकेच्या आकाश चिन्ह परवाना विभागापुढे निर्माण झाले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत पोस्टरद्वारे जाहिरातबाजी करण्यासाठी प्रशासनाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. शहरात अनधिकृत फलकांची संख्या वाढल्याने त्याचा सर्व्हे करून कारवाई करताना पालिकेचा अतिक्रमण विरोधी पथक मेटाकुटीला आला आहे. त्यातच गेल्या महिन्यात पिंपळे सौदागर भागामध्ये आय लव्ह यु शिवडे… या मजकुराचे फलक लावलेले आढळून आले होते. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. सर्वत्र याच फलकांची चर्चा होती.
त्यात भर टाकणारा दुसरा प्रकार घडला आहे. आता “स्मार्ट बायका कुठे जातात? या जागेवर लक्ष ठेवा! 15 ऑक्टोबर” असा मजकूर असलेले पोस्टर शहरात लावण्यात आले आहेत. आकुर्डी ते साने चौकादरम्यान ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे शहरात आता या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू आहे. पोस्टरच्या माध्यमातून शहराची संस्कृती बिघडविणा-या समाजविघातक प्रवृत्तींना आवर घालण्याचे आव्हान पालिका प्रशासनापुढे निर्माण झाले आहे.