निर्भीडसत्ता न्यूज –
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील निगडी-दापोडी या बीआरटीएस मार्गावर बससेवा सुरू करण्यास उच्च न्यायलयाने हिरवा कंदिल दिला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील गेल्या ६ वर्षांपासून रखडलेल्या दापोडी-निगडी या दुहेरी बीआरटीएस मार्गास मुंबई उच्च न्यायालयाने अखेर ‘हिरवा कंदील’ दिला आहे. त्यामुळे येत्या १० दिवसांमध्ये २५ किलोमीटर अंतराच्या मार्गावर जलद गतीने बससेवा सुरू करण्यात येणार आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शुक्रवारी (दि.१०) सांगितले. हा देशातील पहिला दुहेरी बीआरटी मार्ग ठरणार आहे.
दापोडीपासून निगडीपर्यंत एकूण १२.५० किमी अंतरावर स्वतंत्र बीआरटी कॅरिडॉर मागील काही वर्षांपासून तयार आहे. मात्र, या बीआरटीमुळे रस्ता अरुंद झाला असून अपघातांचा धोका निर्माण झाल्याचा आरोप होऊ लागला. पादचारी व वाहनचालकांच्या सुरक्षेच्या मुद्यावरून हिम्मतराव जाधव यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झालेली आहे. या याचिकेवर सुनावणी होऊन याचिकाकर्ते जाधव यांच्या समक्ष या बीआरटी मार्गावर चाचणी घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे एप्रिल व जुलै महिन्यात दोन वेळा बसचाचणी घेण्यात आली.
बीआरटी विभागाचे प्रवक्ते विजय भोजने म्हणाले कि, बीआरटीबाबत आयआयटी पवई संस्थेने सुचविलेल्या सुरक्षाउपयायांचा अवलंब करण्यात आला आहे. त्याप्रमाणे सुरक्षा उपाययोजनांचा अहवाल महापालिकेने न्यायालयाला सादर केला होता. त्यानुसार गुरुवारी (दि.९) न्यायालयाने या याचिकेवर निर्णय दिला. या बीआरटी मार्गावर बससेवा सुरू करण्यास न्यायालयाने मंजुरी दिली आहे. त्यासोबत बीआरटी बससेवा सुरू करून आगामी दोन महिन्यात या बससेवेचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले असल्याचे भोजने यांनी सांगितले आहे.
या मार्गावर ३६ बस थांबे, २७६ बस धावणार
दापोडी ते निगडी या दुहेरी बीआरटी मार्गावर एकूण ३६ बस थांबे आहेत. त्यावरून पीएमपीएलचे प्रती दिनी एकूण २७६ बस धावणार असून, सुमारे २ हजार २०० ते २ हजार ३०० फेर्या होणार आहेत. पुणे स्टेशन, हडपसर, येरवडा, अप्पर इंदिरा नगर, कात्रज, कोथरूड, कोथरूड डेपो, वाघोली, पुणे मनपा, वारजे माळवाडी या प्रमुख मार्गावरील बस धावणार आहेत.
एसटीलाही बंदी
बीआरटी मार्गातून सध्या सर्व वाहनांना प्रवेश दिला जात आहे. मात्र, बीआरटी सेवा सुरू झाल्यानंतर त्यातून कोणत्याही वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. केवळ रूग्णवाहिका व अग्निशामक दलाची वाहनांना प्रवेश मिळेल. एस.टी. बसगाड्यांनाही या मार्गातून प्रवेश दिला जाणार नाही, असे विजय भोजने यांनी स्पष्ट केले.
या मार्गावर एकूण ७ चौक
या मार्गावर निगडीतील भक्ती-शक्ती, लोकमान्य टिळक, आकुर्डीतील खंडोबा माळ, चिंचवड स्टेशन येथील छत्रपती शिवाजी, चिंचवडमधील भगवान महावीर, मोरवाडीतील अहल्यादेवी पुतळा, पिंपरीतील डॉ. आंबेडकर हे ७ चौक आहेत. तर, नाशिक फाटा, दापोडी, फुगेवाडी रेल्वे पुल येथे ‘टी’ चौक आहेत. आकुर्डीतील बजाज ऑटो, काळभोरनगर,वल्लभनगर, कासारवाडी, कुंदननगर, फुगेवाडी हे ६ भुयारी (सबवे) मार्ग आहेत. सीएमई प्रवेशद्वारासमोर आणखी एक सबवे तयार होत आहे.