निर्भीडसत्ता न्यूज –
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत ‘मंगळागौर खेळ’ कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले . सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम मालिकेतील हा ५३ वा कार्यक्रम होता .
‘मनस्विनी ग्रुप’च्या वतीने हा कार्यक्रम गुरुवार, दिनांक ६ सप्टेंबर २०१८ रोजी ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रोड येथे सायंकाळी सादर झाला
‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले .
या कार्यक्रमांतर्गत मंगळागौरीतील ५५ ते ६० खेळांचे सादरीकरण केले गेले. एकूण २० महिलांचा या कार्यक्रमात सहभाग होता. यामध्ये पारंपरिक आणि आधुनिक खेळांची सांगड घातली गेली .
महाराष्ट्राचे अस्सल पारंपरिक खेळ म्हणून मंगळागौरीचे खेळ प्रसिद्ध आहेत. अशा पारंपरिक खेळांचा वारसा, त्याचे महत्व पुढच्या पिढीकडे नेण्याचे काम ‘मनस्विनी ग्रुप’ करीत आहे. गेली २५ वर्षे मंगळागौरीचे खेळ शिकवून त्याचा प्रसार आणि प्रचार करण्याचे काम आमची संस्था करीत आहे.
‘हे खेळ आपल्या आधुनिक जिम ला पारंपरिक पर्याय आहेत त्या दृष्टीने शिकविले जातात. या खेळांच्या माध्यमातून व्यायाम देखील होतो. आपला हा अमूल्य वारसा जतन करण्यासाठी आमच्या संस्थेमार्फत शिकलेल्या स्त्रिया अशा खेळांचे आयोजन करतात’, असे मंजिरी भागवत यांनी सांगितले.
श्रावण महिना आणि मंगळागौर हे जुने नाते यावेळी खेळातून व्यक्त झाले. रिमझिम पडणारा पाऊस , मधूनच डोकावणारे ऊन ,प्राजक्ताचा दरवळ ,दुर्वा- पत्री यांची आरास करून सजवलेले शिवलिंग आणि स्वतः पार्वतीने शंकरासाठी केलेले हे व्रताचा माहोल या महिलांनी उभा केला .
यात फुगड्या,झिम्म्याचे विविध प्रकार, एकमेकींना उचलून खेळ,होड्यांचे प्रकार सादर करण्यात आले .