निर्भीडसत्ता न्यूज –
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरसेविका शितल काटे, रोझलॅड रेसिडेन्सी सोसायटी आणि नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज मंगळवारी रेड डॉट मोहीमेचे आयोजन पिंपळे सौदागर येथील रोझलॅड रेसिडेन्सी सोसायटी येथे करण्यात आले होते. या रेड डॉट मोहीमेस उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. मोहिमेमध्ये रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील विविध सोसायट्यांचे चेअरमन, पदाधिकारी, सभासद व नागरिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
नगरसेविका शीतल काटे म्हणाल्या की, रेड डॉट कॅम्पैन हि संकल्पना रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातच नव्हे तर ती संपूर्ण चिंचवड मतदार संघामध्ये राबवली गेली पाहिजे.
मुंबई आयआयटीच्या प्राध्यापिका रजजी अजवाणी यांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना रेड डॉटचे फायदे सांगितले. मळलेल्या सॅनेटरी नॅपकिन आणि डायपर, स्वयपाक घरातील कच-यात मिसळण्यापासून प्रतिबंध करतील. तसेच वापरल्या जाणा-या सॅनेटरी नॅपकिन, डायपर कचरा व्यवस्थापन स्वच्छता विषयक टाकाऊ पदार्थाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. त्याचे योग्य व्यवस्थापन व विघटन केल्यास त्यापासून कम्पोस्ट खत निर्मिती करता येईल. स्वच्छता विषयी काम करणा-या कामगारांना रेड डॉट कचरा वर्गीकरण करण्यास मदत होईल, यामुळे त्यांना होणाऱ्या आरोग्य समस्या टाळता येतील. रेड डॉट हा कचरा व स्वछेतेचा कचरा वेगळा करण्यास मदत होईल आदी माहिती त्यांनी महिलांना व नागरिकांना दिली.
दरम्यान, यावेळी रेड डॉट स्टीकर चे वाटप करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच राबवलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे स्वागत रहाटणी पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांनी केले. या उपक्रमाबद्धल नगरसेविका शितल काटे, रोझलॅड रेसिडेन्सी सोसायटी व नाना काटे सोशल फाउंडेशनचे आभार मानले.