निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी चिंचवड शहरातील महापालिका शाळांचा दर्जा व गुणवत्ता सुधारण्यासाठी सर्वपक्षीय पदाधिकारी व अधिका-यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. त्यानंतर दिल्लीतील शाळांच्या धर्तीवर शाळांचा सुधारणार असल्याचा निर्धार सर्वपक्षीय गटनेत्यांनी घेतला आहे. महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दिल्लीतील शिक्षकांना बोलविण्यात येणार आहे. पिंपरी महापालिकेच्या शिक्षकांना प्रशिक्षणसाठी दिल्लीत पाठविले जाईल. तसेच शिक्षकांचा वर्ग घेण्यात येणार आहे. शिक्षकांची नकारात्मक भुमिका असल्यामुळे शिक्षण क्षेत्रात पालिकेच्या शाळामागे राहिले आहेत. त्यामुळे शिक्षकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे महापौर राहुल जाधव म्हणाले.
दिल्ली दौ-यावरून परतल्यानंतर महापौर जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले यांनी पत्रकारांना माहिती दिली.
दिल्लीतील आम आदमी सरकारकडून 1148 आणि महापालिकेकडून 42 शाळांचा दर्जा सुधारण्यात आला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांची गुणवत्ता उंचावली आहे. दिल्ली महापालिकेने केलेल्या विविध उपाययोजना व सुविधांची पाहणी या दौ-यात करण्यात आली. तेथील शाळेतील ई-लर्निग, स्मार्ट क्लास, वर्ग व्यवस्था व सुशोभिकरण, उद्यान, क्रीडांगण, ग्रंथालय व वाचनालय, प्रयोगशाळा, स्वच्छतागृह, शिक्षकांचा कक्ष वाखागण्याजोगे आहेत.
शाळेसंदर्भातील माहिती तेथील व्यवस्थापनाकडून घेण्यात आली. शिष्टमंडळासाठी प्रात्यक्षिकांचे सादरीकरणही करण्यात आले. शिष्टमंडळाच्या सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना शाळा व्यवस्थापक व अधिकार्यांनी उत्तरे दिली. दिल्लीतील शाळेच्या धर्तीवर शहरातील पालिका शाळा सुधारल्या जातील. आपण भौतिक व इतर सोयी-सुविधा चांगल्या पुरवित आहोत. शिक्षकांमध्ये व प्रशासनात काही तज्ज्ञांचा समावेश करून दर्जा सुधारण्यावर भर दिला जाईल. त्यासाठी दिल्ली पालिकेसोबत सामजंस्य करार करून त्यांचे काही शिक्षक आपल्याकडे व आपले शिक्षक त्यांच्या शाळेत पाठविले जातील. वेगवेगळे प्रयोग व सर्वांना एकत्र करून या सुधारणा घडवून आणल्या जातील, असे पदाधिका-यांनी सांगितले.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले, ‘दिल्लीतील शाळांमध्ये स्मार्ट क्लास रुम, स्मार्ट ग्रंथालयाची सुविधा आहे. त्यानुसार पिंपरी पालिकेतील शाळांमध्ये देखील सुधारणा केली जाणार आहे. पिंपरी पालिकेच्या शिक्षकांची मानसिकता नकारात्मक असून त्यांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यशाळा घेण्यात येईल. शाळांचा गुणवत्ता, दर्जा सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. तसेच दिल्ली महापालिका आणि पिंपरी महापालिकेमध्ये शैक्षणिक करार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते साने म्हणाले, ‘शहरातील गोरगरिबांना दर्जेदार शिक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेने तातडीने दिल्लीतील शाळांच्या उपक्रमांची अंमलबजावणी सुरु करावी. स्मार्ट सिटीत आणखीन चार शाळांचा समावेश करण्यात यावा.
राहुल कलाटे म्हणाले की, महापालिकेतील शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. दिल्लीतील शाळांमध्ये स्मार्ट शिक्षण देण्यावर भर आहे. महापालिकेने देखील स्मार्ट शिक्षण द्यावे.