निर्भीडसत्ता न्यूज –
पुणे शहर तसेच ग्रामीण भागात बाल लैंगिक अत्याचाराचे गुन्हे घडतांना दिसत आहे. या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे. बाल गुन्हेगारांच्या सुधारणेसाठी योग्य प्रयत्न आणि कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी केल्या.
शासकीय विश्रामगृहात बाल लैंगिक अत्याचार आढावा बैठक पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त आर. के पद्मनाभन, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, महिला व बाल कल्याण विभागाच्या पुणे विभागाचे उपायुक्त दिलीप हिवराळे, महिला व बाल विकास विभागाचे उपायुक्त रवी पाटील, महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या स्वरदा बापट, पोलीस निरीक्षक मनीषा झेंडे, मनोज खंडाळे, दिपाली मोरे, जिल्हा महिला व बालकल्याण विकास अधिकारी अश्विनी कांबळे उपस्थित होते.
पालकमंत्री बापट म्हणाले, लहान मुलांवर तसेच मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या मानसिकतेला नष्ट करणे गरजेचे आहे. फक्त कायदेशीर कारवाईवर न थांबता प्रबोधन आणि जनजागृती होणे देखील महत्त्वाचे आहे. बाल गुन्हेगारांचे प्रमाण कमी होण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करायला हवेत. महाविद्यालये, शाळा येथे अधिक काळजीपूर्वक लक्ष देणे अपेक्षित आहे. महिला अत्याचार व बलात्कारांच्या गुन्ह्यामधील आरोपींना कडक शिक्षा होण्यासाठी न्यायालयीन पातळीवर प्रयत्न करायला हवेत. पोलीस प्रशासनाचे काम उत्तम असून असे गुन्हे घडणारच नाहीत, यासाठी उपाययोजना करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावेत, असे देखील श्री. बापट म्हणाले. या क्षेत्रात काम करण्याऱ्या स्वयंसेवी संस्थांना संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुन्हे कमी होण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृतीची मानसिकता नष्ट करण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाच्या सदस्या श्रीमती बापट यांनी विविध पर्याय व प्रबोधनाबाबत माहिती दिली.