निर्भीडसत्ता न्यूज –
निगडी येथील सिटी प्राईड स्कूलमधील विद्यार्थ्यांचे रविवारी (दि.2) साप्ताहिक सुटीच्या दिवशी रूबेला-गोवर लसीकरण करण्यात आले. त्यावेळी राधाचे वडील पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर व आई अदिती हर्डीकर आवर्जून उपस्थित होते. त्यावेळी आयुक्तांनी 9 महिने ते 15 वर्षे पाल्यास सदर लस देण्याचे आवाहन नागरिकांना केले.
रुबेला व गोवर लसीकरण मोहिमेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पालिका व खासगी शाळा, अंगणवाडी, बालवाडी आणि नर्सरीतील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. त्यात शहरातील सर्व शाळा टप्पा-टप्प्याने सहभागी होत आहेत.
पालिकेचे आयुक्त हर्डीकर सहपत्नीक मुलगी राधा हिच्या शाळेत हजर राहून तिला रूबेला-गोवर लस दिली. ती दुसरीत शिकत आहे. शहरातील प्रत्येक पालकांनी आपल्या 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील सर्व बालक व विद्यार्थ्यांनी ही मोफत लस घ्यावी, असे आवाहन आयुक्त हर्डीकर यांनी या वेळी केले.
दरम्यान, शाळा, अंगणवाडी, बालवाडी, नर्सरीबरोबरच इतर बालकांसाठी पालिकेचे दवाखाने व रूग्णालयात मोफत लसीकरण सुरू आहे. ही मोहिम 27 नोव्हेंबरला सुरू झाली असून, त्या पुढे ती महिनाभर सुरू राहणार आहे. यावेळी पालिकेच्या महिला वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, वैद्यकीय कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते.