निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 1 लाख 61 हजार 475 बालकांनी गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरणाचा लाभ घेतला. या मोहिमेमध्ये 6 लाख 16 हजार 193 बालकांना लस देण्याचे लस देण्याचे उदिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे 27 नोव्हेंबरपासून गोवर-रुबेला प्रतिबंधक लसीकरण मोहीम शहरामध्ये राबविण्यात येत आहे. या मोहीमेंतर्गत पिंपरी-चिंचवड शहरातील नऊ महिने ते पंधरा वर्षे वयोगटातील बालकांना लसीकरण करण्यात येत आहे. या लसीकरणासाठी महापालिका आणि खासगी शाळा, तसेच अंगणवाडी, बालवाडी आणि नर्सरीमध्ये 6 डिसेंबर 2018 अखेर 448 सत्रांचे आयोजन करण्यात आले होते.
त्याअंतर्गत शहरातील एक लाख 61 हजार 475 बालकांना या गोवर-रुबेला प्रतिबंधक लस देण्यात आली. या लसीकरण मोहीमेसाठी सर्व वैद्यकीय अधिकारी, एएनएम, आरोग्य कर्मचारी, महापालिका व खाजगी शाळेतील शिक्षक, तसेच स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले, असे वैद्यकीय संचालक डॉ. पवन साळवे यांनी सांगितले.