निर्भीडसत्ता न्यूज –
भीमानदीकाठावरील कोरेगाव भीमा जवळील ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहेत. मानवंदना सोहळ्यास महाराष्ट्रासह देशभरातून मंगळवारी (1 जानेवारी) लाखो आंबेडकरी बांधव आले आहेत. यावेळी विविध पक्ष, सामाजिक संघटनांच्यावतीने अभिवादन सभांचे आयोजन करण्यात आले आहे.
१ जानेवारी १८१८ साली कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी इंग्रज, महार रेजिमेंट व पेशवे यांच्या सैन्यात घनघोर लढाई झाली. यामध्ये पेशव्यांच्या ३० हजार सैनिकांचा महार बटालियनच्या ५०० शूरवीर सैनिकांनी पाडाव करून विजय मिळविला होता. महार रेजिमेंटच्या अनेक शुरविरांना या लढाईत हौताम्य आले. या धारातीर्थी पडलेल्या शूरवीर सैनिकांच्या शौर्याचे प्रतीक म्हणून इंग्रजांनी १८२२ मध्ये कोरेगाव भीमाजवळ भीमानदीकाठी ‘विजयस्तंभ’ उभारला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी १९२७ सालापासून येत होते. तेव्हापासून महाराष्ट्रासह देशभरातून आंबेडकरी बांधव १ जानेवारीला मोठ्या संख्येने मानवंदना देण्यासाठी येथे कोरेगाव भीमाला येत असतात.