निर्भीडसत्ता न्यूज –
राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या सत्ता काळात पिंपरी-चिंचवड शहरात शास्तीकर लागू झाला आहे. आता तो रद्द करण्याच्या मागणीसाठी ते शंखनाद करीत आहेत. हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहेत, अशी जहरी टीका सत्तारूढ पक्षेनेते एकनाथ पवार यांनी गुरूवारी (दि.31) केली.
सरसकट संपूर्ण शास्तीकर माफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे, काँग्रेस अशा विरोधकांनी एकत्रित येऊन गुरूवारी शंखनाद व घंटानाद आंदोलन केले. त्या आंदोलनावर टीका करताना एकनाथ पवार पत्रकारांशी बोलत होते.
सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शास्तीकराचा प्रश्न सोडविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा करीत आहे. मुख्यमंत्र्यांनी 600 चौरस फुट आकारांच्या अनधिकृत घरांना 100 टक्के शास्तीकर माफ केला आहे. त्याचा लाभ हजारो नागरिक घेत आहेत. तर, पुढील काळात त्याचा लाभ आणखी लोकांना मिळावा म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती केली. त्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. तो प्रश्न भाजपच सोडविणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
त्या मागणीसाठी जागे झालेले विरोधक आता शंखनाद करीत आहेत. ज्यांनी शास्तीकर लादला तेच आज आंदोलन करून सर्वसामान्यांची बाजू घेत आहेत. हा प्रकार हास्यास्पद असल्याची टीका पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली.