निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरात नोंद नसलेल्या मिळकती आहेत. त्या मिळकतधारकांनी येत्या 15 दिवसांमध्ये मालमत्तेची नोंद न करून मिळकतकर भरावे. अन्यथा मालमत्ता जप्तीसह बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारावजा आवाहन पालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गुरूवारी (दि.31) केले आहे.
भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी मिळकत करात वाढ न करता नोंद नसलेल्या मिळकतीचा शोध घेण्याची सूचना आयुक्तांना केली आहे. त्या संदर्भात विचारले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले की, मिळकत कर हे पालिकेच्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत आहे. शहरातील प्रत्येक मिळकतधारकांनी मुदतीमध्ये मिळकतकर भरणे गरजेचे आहे. ज्या अधिकृत आणि अनधिकृत मिळकतीवर कर लागू नाही. त्या मिळकतधारकांनी येत्या 15 दिवसांत जवळच्या कर संकलन कार्यालयात अर्ज देऊन त्यांची स्वत: नोंद करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शहरात अद्याप नोंद न केलेल्या मिळकती आहेत. तसेच, वाढीव मिळकतीची नोंद केलेली नाही. व्यापारी वापर असताना निवासी कर भरला जात आहे. असा मिळकतीची स्वत:हून नोंद करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास संबंधित बांधकाम निष्कासित केले जाणार आहे.
शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षणात आढळून आलेल्या 66 हजार नव्या मिळकतीची नोंद केली गेली आहे. कर वसुलीसंदर्भात कर संकलन विभागाच्या कर्मचार्यांना ‘टार्गेट’ दिले आहे. थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटीसा देण्यात आल्या आहेत. पालिकेच्या वकिलांना प्रलंबित खटले तातडीने निकाली काढण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे यंदा उद्दिष्टापेक्षा 25 टक्के अधिक उत्पन्न मिळकत करातून पूर्ण करण्यात येईल, असा दावा त्यांनी केला.