निर्भीडसत्ता न्यूज –
भाजप-शिवसेना युतीची संभावना असताच मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या विरोधात भाजपतील निष्ठावंतांची फौज उभी ठाकली आहे. युती झाल्यास मावळ मतदार संघातून श्रीरंग बारणे शिवसेनेचे उमेदवार आम्हाला चालणार नाहीत. खासदार बारणे यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उमेदवार शिवसेनेने द्यावा. अन्यथा शिवसेनेच्या तिकीटावर खासदार बारणे पुन्हा उभे राहिल्यास त्यांचा पराभव अटळ समजावा, असा निर्धार पिंपरी-चिंचवड भाजपच्या निष्ठावंत नगरेसवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.
याबाबत आज (रविवार) पिंपरी दौऱ्यावर आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पिंपरी महापालिका सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, माजी महापौर शैलजा मोरे, नगरसेवक नामदेव ढाके, शितल शिंदे, नगरसेविका शर्मिला बाबर, अनुराधा गोरखे, शारदा सोनवणे यांनी निवेदन दिले.
पत्रात नमूद केले आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होण्याची शक्यता आहे. युतीबाबत शहर भाजपतील कार्यकर्त्यांची हरकत नाही. परंतु, मावळ लोकसभा मतदार संघाचे विद्यमान शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी भाजपच्या एकाही कार्यकर्त्याचे काम आजवर केलेले नाही. पाच वर्षात त्यांनी भाजप सरकारवर टिकाच केली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना निवडून आणण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जीवाचे रान केले. परंतु, निवडून आल्यानंतर बारणे यांनी त्याची जाणीव ठेवली नाही.
दरम्यान, स्थानिक पातळीवर खासदार बारणे यांना कोणताही त्रास नव्हता. तरीही, त्यांनी गेल्या पाच वर्षात भाजप नेते, केंद्रीय मंत्री, राज्य मंत्री आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारावर टिका करून प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न केला. म्हणून तर पिंपरी-चिंचवडकरांनी महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला त्यांची जागा दाखवून दिली. बारणे यांना त्यांचे चार नगरसेवक देखील निवडून आणता आले नाहीत. भाजपचा एकही कार्यकर्ता त्यांचे काम आगामी लोकसभा निवडणुकीत करायला तयार नाही, असेही पत्रात नमूद आहे.
पक्षाने आमच्यावर करवाई केली तरी बेहत्तर पण आम्ही श्रीरंग बारणे यांचे काम करणार नाही
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती होईल. मावळ मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला जाईल. तेथून बारणे यांच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उमेदवार देण्यात यावा. भाजपचे स्थानिक कार्यकर्ते त्याचे जोमाने काम करेल. जर, बारणे यांनाच शिवसेनेने उमेदवारी दिली. तर खासदार बारणे यांचा पराभव अटळ समजावा, पक्षाने आमच्यावर करवाई केली तरी बेहत्तर पण आम्ही श्रीरंग बारणे यांचे काम करणार नाही.