निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी नाना काटे यांची निवड झाली आहे. तसे पत्र शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी विभागीय आयुक्तांना शुक्रवारी (दि.25) दिले. त्यामुळे काटे यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड निश्चित झाली आहे.
या वेळी शहराध्यक्ष वाघेरे, शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, नगरसेवक नाना काटे, जावेद शेख, राजू मिसाळ, मोरेश्वर शेडगे, राजू बनसोडे, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ आदी उपस्थित होते. वर्षभराचा कार्यकाळ संपल्याने दत्ता साने यांनी विरोधी पक्ष नेते पदाचा राजीनामा 9 जुलैला दिला होता.
पालिकेत सत्ताधारी भाजपनंतर सर्वांधिक 36 नगरसेवक संख्या राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद आहे. तसेच, विरोधी पक्षनेता हा पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीचा पदसिद्ध संचालक असतो. त्यामुळे या पदाला महत्व आहे.
दरम्यान, विभागीय आयुक्त कार्यालयाकडून येत्या 2 दिवसात कार्यवाही होऊन काटे हे अधिकृतपणे पदाचा कारभार सांभाळण्याची शक्यता आहे.