राष्ट्रवादी महिला आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी पुण्यातील रणरागिणी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी (दि. २७) घोषणा केली.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षाशी सुरुवातीपासून एकनिष्ठ राहणारे अनेक नेते भाजप किंवा शिवसेनेच्या गळाला लागले आहेत. राष्ट्रवादीच्या तडफदार महिला नेत्या म्हणून ओळख असलेल्या चित्रा वाघ यांनी देखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्या राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा होत्या. त्यांनी काही वैयक्तिक कारणांमुळे राष्ट्रवादीला सोडल्याचे बोलले जात आहे. त्यांची जागी पुण्यातील राष्ट्रवादीच्या तोफ आणि रणरागिणी रुपाली चाकणकर यांची पक्षाने निवड केली आहे.
रुपाली चाकणकर यांनी आतापर्यंत महिला आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. त्याचप्रमाणे पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक संघटनात्मक पदांवर त्यांनी काम केले आहे. सामाजिक कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.