सध्या स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका म्हणजे ‘जिवलगा.’ या मालिकेतून अभिनेता स्वप्निल जोशी आणि ‘हँडसम हंक’ सिद्धार्थ चांदेकर हे दोघे अनुक्रमे सात आणि नऊ वर्षांनी छोट्या पडद्यावर झळकले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत अभिनेत्री अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे या अभिनेत्रींनीही स्क्रीन शेअर केली. अशा बड्या कलाकारांमुळे प्रेक्षकांना ही मालिका विशेष आवडली. आता ही मालिका संपणार असल्याचे सिद्धार्थ चांदेकर आणि स्वप्निल जोशी यांच्या सोशल मीडिया पोस्टवरुन स्पष्ट झाले आहे.
सिद्धार्थ चांदेकरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ‘जिवलगा’ मालिकेचे शिर्षक गीत शेअर करत मालिकेच्या चित्रीकरणाचा शेवटचा दिवस असल्याचे म्हटले आहे. दरम्यान त्याने स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर आणि मधूराचे आभार मानले आहेत.
स्वप्निल जोशीने देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने ‘जिवलगा’ मालिकेतील सर्वांचे आभार मानले आहेत. ‘विश्वास वर विश्वास ठेवून, त्याच्यावर मनापासून प्रेम करणारा प्रेक्षक वर्ग हा माझा खरा जिवलगा…’ असे म्हणत त्याने सतीश राजवाडे आणि मालिकेच्या पूर्ण टीमचे आभार मानले आहेत. स्वप्निल आणि सिद्धार्थच्या पोस्टवरुन ‘जिवलगा’ ही मालिका संपणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. चाहत्यांसाठी हा एक सुखद धक्काच असणार आहे.
डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. तर मालिकेची संकल्पना स्टार प्रवाहचे कॉन्टेन्ट अँड प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख सतीश राजवाडे यांची आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ही मालिका उमेश नामजोशी हे दिग्दर्शित करत आहे.