निर्भीडसत्ता न्यूज –
वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी २२ उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी (दि. २४) जाहीर केली. भोसरी विधानसभा मतदारसंघातून अवघ्या २९ वर्षे वयाच्या शाहनवाज जब्बार शेख या मुस्लिम तरूणाला वंचितने उमेदवारी दिली आहे.
वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची यादी जाहीर केली. उमेदवारांच्या पहिल्या यादीत ढीवर, नंदीवाले, काची-राजपूत, छप्परबंद, माना, पटवे-मुस्लिम, माडिया, मनियार, वडार, मुस्लिम आणि भिल्ला आदी वंचित समाजातील उमेदवारांचा समावेश आहे. त्यामध्ये दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. दरम्यान, या यादीत औरंगाबाद आणि सोलापूरच्या जागांचा उल्लेख नसल्याने एमआयएम आणि वंचितच्या आघाडीची शक्यता बळावली आहे.
उमेदवारांची नावे जीहर केल्यानंतर प्रकाश आंबेडकर म्हणाले, “गेल्या ७० वर्षात ज्यांना संधी पासून वंचित ठेवले अशा अलुतेदार, बलुतेदार, कारागीर अल्प लोकसंख्या असलेल्या समाजातील गरीब असले तरी गुणवान उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. उद्योजक व कारागीर समाजाची आजपर्यंत कोंडून ठेवलेली प्रचंड ऊर्जा महाराष्ट्राच्या समाजकारणात मोकळी होत आहे. विविध सामाजिक गटातील सौहार्द व बंधुभाव वाढला आहे. राजकीय आकांक्षा जागृत होत आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रदेशात मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांना भेटताना याचा अनुभव आला. विधानसभा निवडणुकीत मित्र पक्षांबरोबर २८८ जागा लढवणार आहोत. यादी फायनल करण्याचे काम सुरू आहे. उर्वरित यादी २६ सप्टेंबरपूर्वी जाहीर केली जाईल, अशी माहिती प्रकाश आंबेडकर यांनी दिली.