निर्भीडसत्ता न्यूज – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थनार्थ पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी शुक्रवारी (दि. २७) रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. शहर बंदची हाक दिलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी आपापल्या भागात “मी साहेबांसोबत…”ची घोषणा देत फेरी काढून व्यापाऱ्यांना बंद पाळण्याची विनंती केली. बंदला व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र होते.
राज्य सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्याच्या चौकशीत शरद पवार यांचे कोठेही नाव नसल्याचे राष्ट्रवादीचे म्हणणे आहे. तरीही ईडीने त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीने शरद पवार यांच्यावर दाखल गुन्ह्याचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि. २७) शहर बंदची हाक दिली होती.या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे चित्र आहे. विरोधी पक्षनेते नाना काटे, शहराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, माजी महापौर योगेश बहल यांच्यासह राष्ट्रवादीच्या इतर नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या भागात फेरी काढून व्यापाऱ्यांना बंद पाळण्याची विनंती केली. काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून राष्ट्रवादीच्या बंद आंदोलनाला पाठिंबा दिला.