निर्भीडसत्ता न्यूज –
माझ्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लावल्याने अजित पवार अस्वस्थ होते. याच अस्वस्थेतून त्यांनी हा निर्णय घेतला असावा. माझा त्यांच्या संपर्क किंवा भेट झालेली नाही. त्यांच्याशी भेटल्यावरच खरं काय ते कळेल असं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. पुण्यातील मोदीबागेत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहीती दिली आहे.
अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला ही बातमी मला पुण्याला येताना समजली. मला यासंदर्भातली मला कोणताही कल्पना नव्हती. मी त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क साधला. असं शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. अजित पवार म्हणाले की, शिखर बँक घोटाळा प्रकरणात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याला मी तोंड देतो आहे. मात्र यात काकांचं म्हणजे माझं नाव आल्याने मी अस्वस्थ झालो. त्यांच्यामागे चौकशीचं शुक्लकाष्ठ मागे लागलं आहे त्याच उद्विगनतेतून अजित पवार यांनी राजीनामा देत असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. अशी माहिती शरद पवार यांनी दिली.
मी कुटुंबप्रमुख म्हणून मी अजित पवार यांची भेट घेणार आहे. त्यांच्या राजीनाम्याचं कारण मलाही जाणून घ्यायचं आहे. अजित पवार यांनी पार्थ पवार यांच्याशी चर्चा केली. राजकारणात इतक्या खालच्या पातळीचं राजकारण सुरु आहे असं म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या मुलाशी चर्चा केली. आपण राजकारणात न राहिलेलं बरं असंही त्यांनी बोलून दाखवलं. माझ्याशी त्यांच्याशी काहीही चर्चा झालेली नाही. त्यांच्याशी चर्चा झाली की मी याबाबत बोलू शकेन असंही पवार यांनी स्पष्ट केलं.
शिखर बँक प्रकरणात मी कुठेही सभासद किंवा संचालक नव्हतो. त्या प्रकरणात माझंही नाव ईडीकडून घेण्यात आलं याचसंदर्भात मी पुढच्या महिन्यात नसण्यासंदर्भात ईडीला माहिती दिली. तसंच पूर्वसूचनाही मी ईडीला दिली होती. मात्र ईडीकडून मला पत्र आलं की 27 तारखेला येण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला जेव्हा बोलवायचं असेल तर आम्ही तुम्हाला बोलवू असं मला सांगण्यात आलं. तसंच पोलीस आयुक्तांनीही आपण ईडी कार्यालयात जाऊ नये कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं त्यांनी सांगितलं. त्यामुळे परिस्थिती चिघळू नये म्हणून ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय मी तहकूब केला असं शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. पुण्यात अतिवृष्टी झाल्याने परिस्थिती गंभीर झाल्याचं मला समजलं त्यामुळे मी मुंबईतून थेट पुण्यात आलो आहे. पूरग्रस्त भागाची पाहणी केली.
दरम्यान, राज्य मध्यवर्ती सहकारी शिखर बॅँकेच्या कथित कर्ज घोटाळ्यात संशयित आरोपी म्हणून शरद पवारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा पवित्रा घेतला होता. परंतु मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी सिल्व्हर ओक या पवारांच्या बंगल्यावर जाऊन शरद पवारांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. यानंतर माध्यमांसमोर येत शरद पवारांनी ईडीच्या कार्यालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
शरद पवार स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बॅलार्ड इस्टेट येथील ईडी कार्यालयाजवळ सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी 144 कलमान्वये जमावबंदी लागू केली होती. सकाळपासूनच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने जमून ईडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ‘अब की बार शरद पवार’ अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून केल्या जात होत्या.