राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीची नावे उद्या जाहीर होणार
निर्भीडसत्ता न्यूज –
भाजप-शिवसेना- आरपीआय महायुतीचे पिंपरी-चिंचवड शहरातील तिन्ही उमेदारांची नावे मंगळवारी (दि.1) निश्चित झाले आहेत. चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, भोसरीतून भाजपकडून महेश लांडगे आणि पिंपरीतून शिवसेनेचे अॅड. गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा संधी दिली गेली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा उद्या बुधवारी (दि.2) होण्याची शक्यता असून, त्यानंतर खरी लढत स्पष्ट होणार आहे.
गेल्या वेळेस युती नसताना सन 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेचे चाबुकस्वार निवडून आले होते. त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे व भाजप मित्रपक्ष आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांच्या पराभव केला होता. या मतदार संघात शिवसेनेचे नगरसेवक अॅड. सचिन भोसले, माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे तीव्र इच्छुक होते. तसेच, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, माजी नगरसेवक राजेश पिल्ले, भीमा बोबडे, नगरसेवक शैलैश मोरे, नगरसेविका सीमा सावळे, तेजस्विनी कदम या भाजपच्या इच्छुकांनी मतदार संघ पिंजून काढला होता. तर, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे या ही तीव्र इच्छुक होत्या. मात्र, आमदार चाबुकस्वार यांच्यावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विश्वास ठेवत पुन्हा संधी दिली.
मागील निवडणुकीत चिंचवड मतदार संघात लक्ष्मण जगताप यांनी शिवसेनेचे राहुल कलाटे यांना पराभूत केले होते. या मतदारस संघात भाजपचे उपमहापौर सचिन चिंचवडे व नगरसेवक संदीप वाघेरे हे इच्छुक होते. मात्र, लक्ष्मण जगताप यांची शहरावर असलेली पकड लक्षात घेऊन पक्षाने त्याच्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे.
तर, भोसरी मतदार संघात गेल्या निवडणुकीत अपक्ष महेश लांडगे यांनी शिवसेनेच्या सुलभा उबाळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे विलास लांडे यांचा पराजित केले होते. येथून भाजपकडून सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार हे ही इच्छुक होते. अपक्ष आमदार महेश लांडगे यांनी भाजपचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारले होते. त्यामुळे ते प्रथम भाजप चिन्हावर रिंगणात उतरले आहेत.लांडगे यांनी उमेदवारी घोषित होण्याची वाट न पाहता पूर्वीपासून जोरदार प्रचार सुरू केला आहे.
महायुतीमध्ये या तिन्ही विजयी उमेदवारांवर पक्षश्रेष्ठींनी विश्वास ठेवत पुन्हा संधी दिली आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारीची घोषणा बुधवारी (दि.2) केली जाणार आहे. त्यानंतर तिन्ही मतदार संघाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे. त्यानंतर निवडणुकीत खरी रंगत येणार आहे.