निर्भीडसत्ता न्यूज –
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अनेक अधिकारी व कर्मचारी गायब झाले आहे. अधिकारी व कर्मचारी जागेवर नसल्याने कामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे पदाधिकार्यांसह नगरसेवक, नागरिक व सामाजिक कार्यकर्ते पालिका व क्षेत्रीय कार्यालयात फिरकेनासे झाले आहेत. परिणामी, पालिकेत व क्षेत्रीय कार्यालयात शुकशुकाट पसरला आहे.
आचारसंहिता शनिवार (दि.21) पासून लागू झाली आहे. शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी असे 3 विधानसभा मतदार संघ आहेत. निवडणुक विभागाच्या विविध कक्षाचे काम करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पालिकेच्या अधिकारी व कर्मचार्यांना कामे दिल्या जातात. अनेक अधिकारी व कर्मचार्यांना नियुक्तीचे पत्रही दिले गेले आहेत.
आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा, वैद्यकीय, पाणीपुरवठा, विद्युत या अत्यावश्यक विभागातील अधिकारी व कर्मचारी आणि सर्व विभागप्रमुखांना वगळून उर्वरित 4 हजार अधिकारी व कर्मचारी निवडणुक विभागाच्या कामासाठी उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयास पालिकेने कळविले होते. त्यानुसार आतापर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाने 835 अधिकारी व कर्मचार्यांच्या निवडणुकीसाठी नियुक्त्या केल्या आहेत.
चिंचवड मतदार संघासाठी 284, पिंपरी विधानसभेसाठी 262 आणि भोसरीसाठी 285 आणि जिल्हाधिकारी कार्यालयासाठी 4 असे एकूण 835 जणांच्या नियुक्त्या आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झाल्या आहेत. ते सर्व अधिकारी व कर्मचारी शनिवारपासून संबंधित ठिकाणी रूजू झाले आहेत. मतदान व मतमोजणीसाठी आणि आवश्यकतेनुसार आणखी अधिकारी व कर्मचारी निवडणुक विभागाकडे नियुक्त केले जाणार आहे.
आचारसंहितेमुळे पालिकेत अधिकारी व कर्मचारी हजर नसल्याने कामे रेंगाळले आहेत. परिणामी, पदाधिकार्यांसह नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक पालिकेत फिरकेनासे झाले आहेत. त्यामुळे पालिकेते शुकशुकाट निर्माण झाला आहे. निवडणुकीचा निकाल 24 ऑक्टोबरला आहे. त्यानंतर दिवाळीच्या सुट्या आहेत. परिणामी, नोव्हेंबर महिन्यापासून पालिकेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरळीत सुरू होण्याची शक्यता आहे