निर्भीडसत्ता न्यूज –
बारामती विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या अडचणीत निवडणुकी आधीच वाढ झाली आहे. बारामतीतल्या ज्या धनगर समाजाच्या मतांवर डोळा ठेवून भाजपा पडळकर यांना उमेदवारी दिली. त्या धनगर समाजातल्या नेतेमंडळींनी एकत्र येत मंगळवारी रात्री बैठक घेतल्याची माहिती मिळतेय. या बैठकीत आरक्षणाच्या मुद्द्यावरून समाजाला फसवणाऱ्या भाजपच्या उमेदवाराला मदत न करण्याची भूमिका धनगर समाज बांधवांनी घेतली आहे. याबाबतचा निर्णय आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला जाणार असल्याचे धनगर समाजातील कार्यकर्त्यांनी सांगितलं आहे.
गोपीचंद पडळकर यांनी काही महिन्यांपूर्वी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांनी भाजपत घरवापसी केली. ‘गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ आहे, ढाण्या वाघाने जंगलाच्या राजासारखं असावं, म्हणून माझं असं म्हणणं आहे की गोपिचंद पडळकर यांनी बारामतीमधून निवडणूक लढवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तसेच पडळकर वंचितमध्ये गेल्याचे दु:ख झाले होते. पडळकर हे पुन्हा घरात परत आले आहे. त्यांनी धनगर समाजाचे व्रत स्वीकारले, तसेच समाजाला संघटित केले आणि समाजाचा आवाज बुलंद केला. असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा गौरव केला होता.