बॉलिवूडचा हॅण्डसम हंक हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांची उत्तम केमिस्ट्री असलेला ‘वॉर’ हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच या दोघांनी मोठ्या पडद्यावर स्क्रीन शेअर केली. विशेष म्हणजे या चित्रपटातून या दोघांमध्ये झालेलं ‘वॉर’ प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.साहसदृश्यांनी परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता होती. अखेर त्यांची चित्रपट पाहण्याची इच्छा पूर्ण झाली. इतकंच नाही तर हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरविण्यास दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यशस्वी ठरले आहेत.
चित्रपटाची कथा स्पेशल एजंट कबीर ( ऋतिक रोशन) याच्यावर आधारित असून खालिद( टायगर श्रॉफ) हा त्याचा ज्युनिअर सहकारी असतो. मात्र काही कारणास्तव खालिदला कबीरचा शोध घ्यावा लागतो आणि तेथून सुरु होतो या दोघांमधील वॉर म्हणजेच येथूनच चित्रपटाच्या कथेला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. या चित्रपटामध्ये नक्की काय होतं, कबीर आणि खालिद यांची भेट झाल्यानंतर त्यांच्यातील वॉर संपतो की नाही हे पाहण्यासाठी मात्र तुम्हाला चित्रपट पाहावा लागणार आहे. या चित्रपटामध्ये हृतिक आणि टायगरसोबतच अभिनेत्री वाणी कपूरदेखील झळकली असून तिने ग्लॅमरस अंदाजामुळे अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.