निर्भीडसत्ता न्यूज-
पिंपरी (दि. १० ऑक्टोबर २०१९) :- पिंपळे सौदागर येथील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त शनिवार ते सोमवार (दि. ०५ ते ०७ ऑक्टोबर) या दरम्यान महागरबा व भोंडला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
या महागरब्यात शाळेतील विद्यार्थांनी बहारदार नृत्य सादर केले. तसेच, पालक वर्गासाठी पूजाथाळी सजावट, पाक-कौशल्य, गरबानृत्य, फॅन्सी ड्रेस या सारख्या स्पर्धा घेण्यात आल्या. भोंडल्याच्या गाण्यांवर विद्यार्थ्यांसोबत शिक्षिकांनीही फेर धरला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खिरापत वाटण्यात आली. विजेत्या स्पर्धकांना शाळेचे संस्थापक संदिप काटे यांच्या हस्ते बक्षीसांचे वाटपही करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक व पालकवर्ग मोठ्या संख्यने उपस्थित होता.
या प्रसंगी संदीप काटे म्हणाले की, शाळेतील वातावरण विद्यार्थ्यांसाठी आल्हाददायक कसे राहील, याकडे शाळेच्या व्यवस्थापनाचे नेहमीच लक्ष असते. विद्यार्थी दशेतच विद्यार्थ्यांना सांस्कृतिक विषयांची गोडी लागावी, यासाठी अशा महोत्सवाचे आयोजन केले जाते. नवरात्रीनिमित्त शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याने सहभाग नोंदवत आपले कलागुण आत्मसात केले. कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.