निर्भीडसत्ता न्यूज |
मादिगा समाजाला जातीच्या दाखल्यासाठी भेडसावणारी अडचण आपण दूर केली असून आता या समाजाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन पिंपरी विधानसभेचे शिवसेना उमेदवार व आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी आज येथे केले.
श्री आदि जांबमुनी सेवा समाजाच्या वतीने मेळावा आयोजित करून आपला पाठिंबा महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांना आज जाहीर केला. मादरू, मादस व मोची समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात सुमारे नऊ लाख इतकी असून पैकी पिंपरी चिंचवड हा समाज दोन लाखाच्या आसपास आहे.
अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट होत असलेल्या मादिगा समाजाच्या जातीच्या दाखल्याचा प्रश्न १९५० च्या रहिवाशी पुराव्याच्या अटीमुळे भेडसावत होता. चाबुकस्वार यांनी, आपले पुढील व्हिजन मादिगा समाजाच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीसाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शहर संघटिका ॲड. उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, युवा सेना प्रमुख जितेंद्र ननावरे, राष्ट्रीय समाज पक्षाचे शहर अध्यक्ष भरत महानवर, मादिगा सेवा समाजाचे कोडिंबा जेपूल, साईनाथ अध्यक्ष मारूती अण्णा पंद्री यांनी आमदारांचे स्वागत केले व समाजाच्या मागण्यांचे निवेदन यावेळी केले.