निर्भीडसत्ता न्यूज ।
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार आज बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. या बहुमत चाचणीत हे सरकार 170 चा आकडा गाठणार असा विश्वास अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. दुसरीकडे, विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट करत बाळासाहेब थोरात म्हणाले की, नाना पटोले हे विधानसभा अध्यक्ष असतील. उपमुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेस आग्रही नसून तो प्रश्न राष्ट्रवादीचाच आहे. दुसरीकडे, अजित पवार उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्र विकास आघाडी (शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस) सरकारची शनिवारी दुपारी 2 वाजता बहुमत चाचणी होणार आहे. ठाकरे सरकारतर्फे विश्वासदर्शक ठराव मांडला जाईल. यासाठी विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशनही बोलवण्यात आले आहे.
या दोनदिवसीय अधिवेशनासाठी हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू होईल. या अधिवेशनात आधी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळातील सदस्य यांचा परिचय होईल. यानंतर शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि काँग्रेसतर्फे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सरकारचा विश्वासदर्शक ठराव मांडतील. हा ठराव मंजूर झाल्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल. रविवारी सकाळी ११ वाजता पुन्हा विधानसभेचे अधिवेशन भरेल. त्यात आधी अध्यक्षांची निवड केली जाईल. त्यानंतर विरोधी पक्षनेत्याची निवड होईल. दुपारी ४ वाजता राज्यपालांचे अभिभाषण पटलावर ठेवण्यात येईल. त्यानंतर अधिवेशन संस्थगित होईल. दरम्यान, नागपूरचे हिवाळी अधिवेशन 16 ते 21 डिसेंबर या एका आठवड्याच्या कालावधीसाठी भरविण्यात येणार आहे.