स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांची माहिती
निर्भीडसत्ता न्यूज –
दापोडीतील घटनेत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशामक दलाचे फायरमन विशाल जाधव यांचा मृत्यू झाला. त्याच्या पत्नीस अनुकंपा तत्वावर महापालिकेत नोकरी दिली जाणार आहे. तसेच, जाधव यांच्या कुटुंबास एकूण 10 लाख रूपयांची रक्कम विमापोटी मिळणार आहे, असे स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी सांगितले.
महापालिकेच्या अग्निशामक विभागातील धोकादायक स्वरुपाचे काम करणार्या अधिकारी व कर्मचार्यांचा न्यू इंडिया इन्सुरन्सकडे विमा उतरविण्यात आलेला आहे. त्या अंतर्गत कर्मचार्यांच्या कुटुंबियास 10 लाख इतकी रक्कम मिळणार आहे. तसेच, महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाकडील 11 ऑगस्ट 2017 च्या आदेशान्वये राज्य शासकीय कर्मचारी समुह वैयक्तिक अपघात विमा योजना अंतर्गत 10 लाख असे एकूण 20 लाख इतकी रक्कम विम्यापोटी मिळणार आहे, असे विलास मडिगेरी यांनी सांगितले.
या दुर्घटनेमध्ये ठेकेदाराकडील नागेश जमादार या मजुराचा मृत्यू झाला. निविदेतील अटी,शर्तीनुसार ठेकेदाराने उतरविलेल्या विमामधुन मजूरास 2 लाख रक्कम विमापोटी मिळणार आहेत. याशिवाय ठेकेदाराकडून जास्तीत जास्त मदत त्याच्या कुटुंबियाला देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. घटनेत बचावकार्य करताना काही कामगार जखमी झाले आहेत. त्यांनाही वैद्यकीय उपचाराच्या खर्चासाठी पालिका व संबंधित ठेकेदारांकडून मदत केली जाईल, असे मडिगेरी यांनी सांगितले.
अमृत योजनेअंतर्गत शहरातील मलनिस्सारण व्यवस्थाचे (ड्रेनेज) काम पाटील कन्स्ट्रक्शन व इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 7 मार्चला देण्यात आले. त्या अंतर्गत दापोडी येथील आई उद्यानाजवळील पाण्याच्या टाकीजवळ ड्रेजेन लाईन टाकण्याचे काम सुरू होते. निविदेतील अटी व शर्तीमध्ये स्पष्टपणे सुटीचे दिवशी ठेकेदाराने काम करू नये, असे असताना ही ठेकेदाराने सुटीच्या दिवशी काम करण्यासाठी कामगारांना बोलविले आहे. काम करताना सुरक्षिततेची कोणतीही उपाययोजना केलेली नव्हती. सुटीच्या दिवशी काम करण्यासाठी पालिका अधिकार्यांची कोणतीही परवानगी घेतली नव्हती, असे स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी सांगितले