निर्भीडसत्ता न्यूज ।
स्थायी समितीच्या आज झालेल्या सभेत कामकाजाच्या पद्धतीवरून सभापती विलास मडिगेरी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. मनमानी पद्धतीने मडिगेरी यांचा कारभार रेटून नेण्याचा प्रयत्न इतर सदस्यांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केल्यामुळे जोरदार वाद झाला. यातूनच नगरसेवक मयूर कलाटे यांचा उल्लेख एकेरी भाषेत केल्यामुळे राहुल कलाटे यांच्यासह इतर सदस्य त्यांच्या मदतीला धावून गेल्यामुळे गोंधळ उडाला. अखेर या गोंधळातच आजची सभा पुढील बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आली.
स्थायी समितीच्या बुधवारी (दि.4) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी विलास मडिगेरी होते. नेहमीच्या प्रथेनुसार सभेपूर्वीची बैठक झाली नाही. थेट दुपारी अडीचला सभा सुरू झाली. अध्यक्षांच्या सूचनेवरून कामकाज सुरू झाले. क्रमांक एक ते शेवटच्या विषयांना एकत्रित रित्या कोणतीही चर्चा न होऊ देता मंजुरी देण्याचा विषय सदस्य सागर आंगोळकर यांनी मांडला. चुकीच्या पद्धतीने सर्व विषय एकाच वेळी चर्चा न होऊ देता मंजूर करण्यास शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला. त्यास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सदस्य मयूर कलाटे यांनी समर्थन दिले.
ज्या विषयाला मंजुरी द्यावयाची आहे, त्या प्रत्येक विषयावर चर्चा केली जावी. त्यासंदर्भातील ‘डॉकेट’ सदस्यांसमोर ठेवले जावे, अशी मागणी कलाटे यांनी केली. ही मागणी धडकावून लावत सदस्यांना केवळ मंजूर किंवा ना मंजूर म्हणण्याचा अधिकार असून कोणत्याही विषयावर चर्चा होणार नसल्याची भूमिका मडिगेरी यांनी घेतली. त्यामुळे वाद वाढत गेला. तर अध्यक्षांच्या इशाऱ्यावर चालवणाऱ्या नगरसचिव उल्लास जगताप यांनी अध्यक्षांच्या सूचनेनुसारच कामकाज करावे लागेल, अशी नियमातील तरतूद वाचून दाखविली. त्यामुळे वादात आणखीनच भर पडली. यावर सदस्यांचे अधिकार सांगा अशी मागणी राहुल कलाटे यांनी केली. ही माहिती नगरसचिवांच्या कार्यालयात जावून घ्यावी, या ठिकाणी देता येणार नसल्याचे सांगत सभा रेटून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावरून अध्यक्षांसोबत दोन्ही कलाटे यांचा वाद वाढला.
नियमानुसारच कामकाज सुरू असल्याचे अध्यक्षांनी पुन्हा स्पष्ट केले. त्यावर संताप व्यक्त करीत, सदस्यांना टक्केवारी नको. मात्र, नियमानुसार सभा चालवा, असा आग्रह कलाटे यांनी लावून धरला. वाद वाढत जाऊन चर्चा एकेरीवर घसरली. व शाब्दिक वादही वाढला. वाद घालण्यापेक्षा सभा तहकूब करा, अशी सूचना भाजपचे शीतल शिंदे यांनी मांडली. त्याचे दोन्ही कलाटेंनी समर्थन केले. अखेर पुढील बुधवार पर्यंत ही सभा तहकूब करण्यात आली.
वादास त्यांच्याकडून सुरुवात – मडिगेरी
मी दिवसभर इतर कामात असल्यामुळे पुर्व बैठक घेण्यास वेळ मिळाला नाही. सर्व विषयांवर चर्चा करण्याची माझी तयारी होती मात्र राहुल कलाटे व मयूर कलाटे यांनीच वाद घालण्यास सुरुवात केली. अधिक वाद नको म्हणून आजची सभा तहकूब करण्यात आल्याची प्रतिक्रिया स्थायीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी दिली.