निर्भीडसत्ता न्यूज ।
शोषित-पीडित समाजाला जगण्याचं आत्मभान देणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६३व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरच्या चैत्यभूमीवर हजारो भीमसैनिक दाखल झाले आहेत. हातात निळा झेंडा घेऊन डोक्याला ‘जयभीम’ची निळी पट्टी बांधून देशाच्या कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाल्याने शिवाजी पार्कवर जणू भीमसागर उसळल्याचं चित्रं निर्माण झालं आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई महापालिका आणि बेस्ट प्रशासनानेही जय्यत तयारी केली असून शिवाजी पार्कवर सर्व सोयी -सुविधा देण्यात आल्या आहेत. तर महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सकाळी चैत्यभूमीवर जाऊन आंबेडकरांना अभिवादन करणार आहेत.
महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने ३ डिसेंबरपासूनच देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो भीमसैनिक चैत्यभूमीवर येऊ लागले आहेत. ‘जयभीम’चा जयघोष करतच हजारो लोक चैत्यभूमीवर दाखल होत आहेत. आज सकाळपासून तर चैत्यभूमीकडे येणाऱ्या भीम अनुयायांची संख्या प्रचंड वाढली आहे. कुटुंब व आपल्या मुलाबाळांसह हजारो भीमसैनिक चैत्यभूमीवर येऊन महामानवाला अभिवादन करत आहे.यंदा चैत्यभूमीवर गर्दीचा उच्चांक होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.कालपासूनच शिवाजी पार्क परिसरात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहे. आंबेडकरी गायक, कलावंत भीमगीतं गाऊन आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन करत आहेत.कविसंमेलनांमधूनही महामानवाला अभिवादन केलं जात आहे.