निर्भीडसत्ता न्यूज –
निवडणूक विभागात तब्बल 5 वर्षांपेक्षा अधिक काळ काम करीत असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेचे 17 क्रीडा शिक्षक अखेर पालिकेत रूजू झाले आहेत. त्यांना शाळेतील विद्यार्थ्यांना खेळांचे प्रशिक्षण देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लोकसभेपाठापाठ झालेली विधानसभा निवडणूक संपली आहे. त्यामुळे शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभा निवडणूक कार्यालयात काम करीत असलेल्या क्रीडा शिक्षकांसह एकूण 43 जणांना कार्यमुक्त करण्याची मागणी पालिका प्रशासनाने निवडणूक जिल्हा प्रशासनाकडे केली होती. तसेच, वरिष्ठ अधिकार्यांनी थेट कारवाईचा इशारा दिला होता. त्यामुळे 17 क्रीडा शिक्षक गेल्या आठवड्यात पालिकेच्या क्रीडा विभागात रूजू झाले आहेत.
या संदर्भात क्रीडा विभागाचे सहायक आयुक्त संदीप खोत यांनी सांगितले की, महापालिकेच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापौर चषक टेन-व्टेंटी शालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. स्पर्धेत एकूण 17 क्रीडा प्रकारांच्या स्पर्धा होणार आहे. त्या खेळांचे प्रशिक्षण पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना द्यावे, असे आदेश नुकतेच त्या क्रीडा शिक्षकांना देण्यात आले आहेत.
दरम्यान, निवडणूक विभागाकडे असलेले अन्य काही कर्मचारी व लिपिक अद्याप पालिकेत रूजू झालेले नाहीत. पालिकेत रूजू झाल्याशिवाय त्याचे वेतन अदा केले जाणार नाही, असे इशारा पालिका प्रशासनाने त्यांना दिला आहे.