निर्भीडसत्ता न्यूज –
पिंपरी-चिंचवड शहरातील रुग्णांना सवलतीच्या दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे 31 आरोग्य केंद्राच्या माधमातून वैद्यकीय उपचार आणि विविध चाचण्या सवलतीच्या दरात दिल्या जाणार आहेत. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका वैद्यकीय विभागातर्फे करण्यात आले आहे.
माता आणि बालकांच्या विविध उपचार, तसेच रक्त, लघवी आणि इतर चाचण्या सवलतीच्या दरात केल्या जाणार आहेत. केंद्र शासनाच्या पुढाकारातून ही योजना राबविण्यात येत आहे. राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना फ्री डॉयग्नोस्टिक सव्रिहसेस इनिसेटिव्ह एचएलएल अंतर्गत ही सेवा दिली जाणार आहे.
आजार होऊ नयेत, तसेच चांगले उपचार व्हावेत, यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. जून 2019 मध्ये शासनाने याला मंजुरी दिली आहे. त्यानुसार महापालिकेने कार्यवाही केली आहे. या वैद्यकीय सेवेसाठी महापालिकेने मनुष्यबळही उपलब्ध करुन दिले आहे. त्याचप्रमाणे आवश्यक साधनसामुग्रीही उपलब्ध करुन दिली असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली आहे.
शहरातील आरोग्य केंद्रे
संभाजीनगर येथील आई अम्ब्रेला गार्डन, चिखलीतील घरकुल, रामनगर येथील श्रीराम मंदिराजवळ, रुपीनगर-तळवडे येथील प्रबोधनकार ठाकरे प्राथमिक शाळा, सिंधुनगर प्राधिकरणातील एलआयजी कॉलनीजवळ, म्हेत्रे वस्तीत महापालिका शाळेजवळ, मोशी-आळंदी चौकात मोशी दवाखाना, चछहोली गाव, दिघी गावातील जुना जकात नाका, बोपखेल मारुती मंदिराजवळ, नेहरुनगर येथील महापालिका गोदामाशेजारी, कासारवाडीतील करसंकलन कार्यालय इमारत, फुगेवाडीतील विठ्ठल मंदिराशेजारी, दापोडीतील बॉम्बे कॉलनी, भाटनगर, काळेवाडी महापालिका शाळेशेजारी, पिंपरीगाव, पिंपळे सौदागर गावातील महापालिका शाळेसमोर, चिंचवड-बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, किवळे महापालिका शाळेशेजारी, आकुर्डी, जुनी सांगवी आणि निगडीतील यमुनानगर येथील आरोग्य केंद्रात वैद्यकीय सुविधा दिल्या जाणार आहेत.