निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी :पिंपरी-चिंचवड महापालिकेचे शहरात 1 लिंगायत, 1 ख्रिश्चन व 8 मुस्लिम असे एकूण 10 दफनभूमी आहेत. तेथील दैनंदिन कामकाजासह स्वच्छता कामासाठी पालिका खासगी काळजीवाहक संस्था नेमते. एकूण दहापैकी सहा मुस्लिम दफनभूमीसाठी 3 वर्षांसाठी तब्बल 2 कोटी खर्च केला जाणार आहे.
या कामासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात चार दफनभूमीसाठी 4 संस्था पात्र ठरल्या. त्यानुसार त्या संस्थांची नियुक्ती करण्यात आली आहे. उर्वरित 6 मुस्लिम दफनभूमीपैकी दापोडी, चर्होली, कुदळवाडी व निगडी या 4 दफनभूमीसाठी 4 धार्मिक संस्थांची निवड करण्यात आली आहे.
त्यानुसार दापोडीसाठी नेहरूनगर येथील पिंपरी-चिंचवड मुस्लिम वेल्फेअर कब्रस्तान अॅण्ड ईदगाह कमिटी ही संस्था पात्र ठरली आहे. चर्होली व निगडी या दोन दफनभूमीसाठी दिघी रस्ता, भोसरी येथील भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद पिंपरी-चिंचवड शहर स्मारक समिती पात्र ठरली आहे. तर, कुदळवाडीसाठी खराळवाडी येथील पिंपरी-चिंचवड मुस्लिम विकास परिषदेची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती 30 नोव्हेंबर 2019 ला करण्यात आली आहे.
उर्वरित फुगेवाडी व कासारवाडी दफनभूमीसाठी चिठ्ठया काढून संस्थाची निवड 4 डिसेंबर 2019 ला करण्यात आली आहे. त्यात फुगेवाडीसाठी खराळवाडी येथील पिंपरी-चिंचवड मुस्लिम विकास परिषद आणि कासारवाडीसाठी दिघी रस्ता येथील मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक समितीची निवड झाली आहे.या संस्थांकडून प्रत्येक दफनभूमीसाठी 4 काळजीवाहक पुरविण्यात येणार आहे. तसेच, इतर कामे केली जाणार आहे. त्यासाठी 3 वर्षांसाठी येणार्या 1 कोटी 96 लाख 90 हजार 560 रूपये खर्च अपेक्षित आहे. या खर्चास मंजुरीचा प्रस्ताव येत्या बुधवारी (दि.8) होणार्या स्थायी समिती सभेपुढे आहे.