निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचारी महासंघाला माजी अध्यक्षाच्या मनमानी कारभारामुळे व भ्रष्ट्राचारामुळे गेल्या २० वर्षात प्रथमच निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. अशा कामगारविरोधी व घोटाळेबाजांमुळे कार्मचाऱ्यांची सहनशक्ती संपली असून येत्या शनिवारी ( दि. ९ ) होणाऱ्या महासंघाच्या निवडणुकीत कर्मचारी त्यांना त्यांची जागा दाखवतील. तसेच या निवडणुकीत आपल्या २१ पैकी २१ जागा निवडून येतील असा विश्वास आपला महासंघाचे पॅनल प्रमुख अंबर चिंचवडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
केवळ कंत्राटे मिळवणे, जवळच्या लोकांना आर्थिक लाभ मिळून देणे माजी अध्यक्षाचा धंदा आहे. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना सवलतीच्या दरात औषधे मिळावीत यासाठी यासाठी महासंघाच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या महासंघ मेडिकल व कर्मचारी पतसंस्थेमध्येही या पदाधिकाऱ्यांनी भ्रष्ट्राचार केला आहे, असा आरोप यावेळी चिंचवडे यांनी केला.
पत्रकारपरिषदेत आपला महासंघ पॅनलचे उमेदवार अभिमान भोसले, सुप्रिया सुरगुडे, योगेश रसाळ, बाळासाहेब कापसे, अविनाश ढमाले, धनाजी नखाते, गोरख भालेकर, शुभांगी चव्हाण, विलास नखाते, अमित जाधव, सुरेश गारगोटे, बाळू साठे, अनिल राऊत, धनेश्वर थोरवे, अविनाश तिकोणे, रणजित भोसले, सुभाष लांडे, मिलिंद काटे, नवनाथ शिंदे, योगेश वंजारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
कामगार भवन निविदेत ५ कोटींचा गैर व्यवहार
थेरगाव सर्व्हे नंबर ९ मध्ये कर्मचारी महासंघाला महापालिकेकडून कामगारभवन बांधण्यासाठी ६० गुंठे जागा देण्यात आली. महासंघाच्या पैश्यातून इमारत बांधली जाणार असताना अध्यक्षानी मात्र, ही प्रक्रिया अतिशय गुप्तपणे राबविली. त्यातच कामगार भवन इमारतीचे बांधकाम ४. ८० कोटी रुपयांमध्ये होत असताना हेच बांधकाम १०.३१ कोटी रुपयांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून जवळपास ५ कोटी रुपये घोटाळा करण्याचा डाव स्पष्ट होत आहे.
धन्वंतरी योजनेतही कामगार, महापालिकेची फसवणूक
कर्मचाऱ्यांसाठी वरदान ठरलेली धन्वंतरी योजना काही पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थीपणामुळे अडचणीची ठरू लागली. दुकान व औषध परवाना स्वतःच्या नवे केला. स्वतःला विश्वस्त बनवले. याबाबत माहिती अधिकारांतर्गत धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागितली असता अशी कोणतीही ट्रस्ट स्थापन केली नसल्याचे समोर आले. यामुळे कर्मचारी व महापालिकेची फसवणूक झाली असल्याचे त्यांनी सांगितले.