निर्भीडसत्ता न्यूज :
पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत घरांना लागू केलेला संपूर्ण शास्तीकर सरसकट माफ करा. शहरातील गोरगरीब कामगारांना शास्तीकरातून मुक्ती देऊन त्यांची शास्तीकरातून सुटका करा, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
राहुल कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहर कामगारनगरी म्हणून ओळखली जाते. स्वत:च्या जागेमधील अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचे धोरण शिवसेना व भाजप युती सरकारच्या कार्यकाळात निश्चित झाले आहे. मात्र, आतापर्यंत केवळ 1 हजार चौरस फुट आकारांच्या अनधिकृत घरांना शास्तीकर माफ केला आहे. त्यामुळे इतरांची फसवणूक झाली आहे, असे कलाटे यांनी निवेदनात म्हटले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शास्तीकर सरसकट माफ करण्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले होते. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे मार्च महिन्यापूर्वी अनधिकृत घरांना सरसकट शास्तीकर माफ करावा, अशी मागणी राहुल कलाटे यांनी केली आहे.
शास्तीकर आणि त्यावरील 24 टक्के व्याजाच्या दंडामुळे नागरिक मिळकतकर आणि शास्ती भरत नाहीत, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.