पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाच्या वतीने ऐन उन्हाळ्यात आणखी 1 हजार 500 ट्री गार्ड आणि 1 हजार 500 लोखंडी बाके खरेदी करण्यात येत आहेत. ट्री गार्डसाठी 17 लाख 72 हजार 725 आणि बाकांसाठी 1 कोटी 94 लाख 68 हजार 500 असे एकूण 2 कोटी 12 लाख 41 हजार 257 रूपये खर्च केला जाणार आहे.
या खर्चास स्थायी समितीने नुकतीच मंजुरी दिली आहे. पालिकेच्या वतीने शहरात वृक्षारोपण केले जाणार आहे. झाडांच्या सुरक्षेसाठी त्याभोवती एमएस ट्री गार्ड लावले जाणार आहेत. एका ट्री गार्डची किंमत 1 हजार 197 आहेे. त्यानुसार दीड हजार ट्री गार्डची एकूण किंमत 17 लाख 72 हजार 725 रूपये इतके होते. हे काम चिंचवडच्या रेखा इंजिनिअरिंगला थेट पद्धतीने देण्यात आले आहे. या पूर्वी उद्यान विभागाने त्याच ठेकेदाराकडून एकूण 2 हजार 962 ट्री गार्ड 1 हजार 197 रूपये दराने 9 सप्टेंबर 2019 ला खरेदी केले आहेत. त्यास एकूण 35 लाख 45 हजार 514 रूपये खर्च करण्यात आला होता.
तर, उद्यान आणि सार्वजनिक ठिकाणी बसविण्यासाठी लोखंडी बाके खरेदी करण्यात येणार आहेत. एका बाकाची किंमत 12 हजार 979 रूपये आहे. एकूण दीड हजार बाकांसाठी 1 कोटी 94 लाख 68 हजार 500 रूपये खर्च अपेक्षित आहे. हे काम निर्मिती इंजिनिअरिंगला देण्यात आले आहे. किंमत निविदा दरापेक्षा 34.49 टक्काने कमी असल्याचा दावा उद्यान विभागाने केला आहे. ऐन उन्हाळ्यात ट्री गार्ड व बाकांची खरेदी केली जात असल्याने शंका उपस्थित केली जात आहे.