लोणी धामणी |निर्भीडसत्ता न्यूज
सकाळी दहावीचा पेपर अन् आदल्या रात्री आईने जगाचा निरोप घेतला. याही परिस्थितीला मोठ्या धैर्याने तोंड देत आईचे अंत्यदर्शन घेऊन आंबेगाव तालुक्यातील धामणी येथील ज्ञानेश्वरीने आज दहावीचा पेपर दिली.
‘आई मी खूप अभ्यास करीन आणि मोठी अधिकारी बनून तुझं स्वप्न नक्की पूर्ण करीन, नको ना सोडून जाऊ आम्हाला’… अशी आर्त हाक ज्ञानेश्वरीने तिच्या आईला मारली आणि अंत्यविधीसाठी उपस्थित जन समुदायाचा अश्रूंचा बांध फुटला. ही हृदय हेलावून टाकणारी घटना धामणी येथील गवंडीमळा येथे घडली आहे.
सोमवारी (दि. 2) रात्री साडेदहाला सविता दादाभाऊ गवंडी (वय 33) या महिलेचे अल्पशा आजाराने निधन झाले. घटना घडली त्यावेळी इयत्ता दहावीत असणारी ज्ञानेश्वरी दुसऱ्या दिवशी परीक्षा असल्याने शेजारीच अभ्यास करत बसली होती; मात्र रात्रीच्या वेळी आईचे अचानकपणे निधन झाल्याने तिला जबर धक्का बसला. मंगळवारी (दि. 3) सकाळी ज्ञानेश्वरीने आईचे अंत्यदर्शन घेतले आणि अंत्यविधी झाल्यानंतर थेट परीक्षा केंद्रावर ती दहावीचा पेपर देण्यासाठी गेली. तिच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नव्हते. यावेळी तिचे वडील, नातेवाईक, ग्रामस्थ, शिक्षकांनी तिला आधार देण्याचा प्रयत्न केला. तिचा भाऊ तुषारने बारावीचे पेपर दिले आहेत.अखेर त्यांच्या निधनामुळे कुटुंबाची वाताहात झाली असून परिसरात शोककळा पसरली आहे.