पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. असे असताना महामेट्रोकडून कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. मास्क व सॅनिटाझरविना मेट्रोचे शेकडो काम करीत असल्याचे दिसत आहे.
दापोडीच्या हॅरिस पुल ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुल या 7.5 किलोमीटर अंतराच्या मार्गावर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू आहे. हे काम दिवसा व रात्र असे 24 तास सुरू आहे. जगासह देशात आणि पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना आजाराची मोठी साथ सुरू आहे. त्यामुळे मेट्रोच्या शेकडो कामगारांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून दक्षता व खरबदारी घेणे अत्यावश्यक बनले आहे.
मात्र, मेट्रोच्या बहुतांश कामगारांच्या तोंडावर मास्क दिसत नाही. काही तुरळक संख्येने कामगार रूमाल बांधून काम करीत असल्याचे दिसत आहे. मास्क न लावताच अनेक कामगार सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर काम करीत आहेत. तसेच, कामांच्या ठिकाणी हात धुण्यासाठी साबण, लिक्वीड सोप तसेच, सॅनिटाझरची सोय केली नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
कोणतीची दक्षता व खबरदारी न घेता मेट्रोचे शेकडो कामगार काम करीत असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, कामगार राहत असलेल्या कासारवाडी वस्तीतही कोरोना संदर्भात खरबदारी व दक्षता घेतली जात नसल्याचे चित्र आहे.
मेट्रोच्या कासारवाडी लेंबर कॅम्पात कामगारांचे निर्जंतुकीकरण
पुणे मेट्रोच्या कासारवाडी (पिंपळे गुरव) व किवळे येथील कास्टिंग यार्ड आणि कासारवाडीतील लेंबर कॅम्पमध्ये सर्व कामगारांचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आली आहे. सदृढ असलेल्या कामगारांना काम करू दिले जात आहे. त्या ठिकाणी त्याचे निर्जंतुकीकरण केले जात आहे. तेथे हात धुण्यासाठी साबण व लिक्वीड सोपची व्यवस्था केली आहे. कामांच्या ठिकाणी साबण व लिक्वीड सोपची व्यवस्था आणि सर्व कामगारांना मास्क पुरविता येणार नाहीत, असे महामेट्रोचे जनसंपर्क विभागाचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे यांनी सांगितले.