पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात निर्माण झालेला कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाणीपट्टी, मिळकतकर, बांधकाम परवानगी आदी अनेक बिले भरण्याची मुदत 31 मार्चपर्यंतची मुदत 2 महिन्यांनी वाढवावी, अशी मागणी उपमहापौर तुषार हिंगे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे मंगळवारी (दि.24) केली आहे.
देशात कोरोना विषाणूचा हाहाकार पसरला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना बाधीत रुग्णाची संख्या 12 वर पोहोचली आहे. सध्या मार्च महिना चालू असून महापालिकेची पाणीपट्टी, मिळकतकर, बांधकाम परवानगी अशी अनेक बिले भरण्याची मुदत 31 मार्चपर्यंत आहे. त्यामुळे बिले भरण्यासाठी अनेक नागरिक पालिकेच्या कार्यालयात ये-जा करताना दिसत आहेत.
नागरिकांची गर्दी म्हणजेच कोरोनाचा धोका अधिक, तसेच बिले भरण्याची कामे घरातील वयस्कर मंडळी करतात. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बिले भरण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी. तसेच, नागरिकांना बिले भरण्यासाठी ऑनलाईनचा वापर करण्याचे आवाहन करण्यात यावे, अशी मागणी उपमहापौर तुषार हिंगे यांनी केली आहे.