पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
कोरोनाचा संसर्ग व फैलाव रोखण्यासाठी घेण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय देशाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. देशभरातील नागरीक या निर्णयाचे पालन करणे हे आपले प्रथम कर्तव्य समजून घरात राहत आहेत. महाराष्ट्रातील असंघटीत बांधकाम कामगार सुद्धा सरकारी आदेशाचे पालन करीत आहे. मात्र या असंघटित बांधकाम कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येक नोंदित बांधकाम कामगाराच्या थेट बँक खात्यात १० हजार रुपये जमा करण्यात यावेत, अशी मागणी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच कामगार मंत्री, कामगार राज्यमंत्री व कामगार मंत्रालयाच्या सचिवांकडे केली आहे. यासंदर्भात इरफान सय्यद यांनी मुख्यमंत्री व कामगार मंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे,
महाराष्ट्रात असंघटीत क्षेत्रातील अनेक कामगार आहेत ज्याचे हातवरचे पोट आहे . बांधकाम कामगार हा असाच हातावर पोट असणारा असंघटीत कामगार आहे. महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण महामंडळांतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी केली जाते. या मंडळांतर्गत नोंदीत जिवित बांधकाम कामगारांची संख्या १३ लाख ऐवढी आहे. कष्ट करून रोजचे रोज हातावर पोट असणाऱ्या या बांधकाम कामगारांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आदेशाचे पालन करत त्यांना घरातच राहावे लागत आहे. रोजदारीवर काम करून उदरनिर्वाह करणारे हे कामगार २१ दिवस खाणार काय? काम बंद असल्याने पोटापुरते कमवणाऱ्या या कामगारांची परिस्थिती दोन दिवसातच बिकट झाली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगार यांची माहिती आहे. तसेच मंडळाकडे सेस (निधी) जमा आहे. संकटाच्या या कठीण काळात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण महामंडळाने या आपल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. महाराष्ट्र मजदूर संघटना पुणे जिल्ह्यातील २५ हजार नोदंणीकृत बांधकाम कामगारांचे प्रतिनिधित्व करीत आहे. या बांधकाम कामगारांच्या थेट बँक खात्यात सरसकट रक्कम १० हजार रुपये जमा करावे. जेणेकरून या २१ दिवसाच्या लॉकडाऊनच्या संकट काळात ते आपला उदरनिर्वाह करू शकतील, असे सय्यद यांनी म्हटले आहे.