पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
कोरोनामुळे देशभरात लागू असलेल्या संचारबंदीमुळे पिंपरी-चिंचवडमधील हातावर पोट असणाऱ्या कष्टकऱ्यांच्या हातचे काम गेले आहे. रोज काम करून जगणारा वर्ग आता मोठ्या चिंतेत आहे. त्यांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झालेला असताना या कष्टकऱ्यांना अन्नाची सोय व्हावी म्हणून कष्टकरी संघर्ष महासंघाने भोजन व्यवस्था सुरु केली आहे. त्याचा शहरातील कष्टकरी वर्गाला आधार वाटत आहे.
कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, राष्ट्रीय समन्वयक चंदन कुमार, माजी नगरसेवक भीमा बोबडे, उपाध्यक्ष राजेश माने, संघटक भास्कर राठोड, नाना कसबे, निरंजन लोखंडे, वासुदेव काळसेकर, शेषराव गायकवाड, महादेव गायकवाड, नंदकिशोर श्रीवास, तुकाराम माने, ओमप्रकाश मोरया, उमेश डोर्ले आदी उपस्थित होते.
कष्टकरी संघर्ष महासंघाच्या चिंचवड येथील कार्यालयासमोर हा उपक्रम सुरू करण्यात आला. मात्र कष्टकऱ्यांची मोठी प्रमाणात गर्दी होत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे पालन होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे महासंघाने आता कष्टकरी कामगारांना बंद पॅकेट स्वरूपामध्ये गरजू पर्यंत जेवण पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे .