पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या प्रयत्नातून शहरातून जळगाव, धुळे, नंदूरबार आणि बुलढाणा या जिल्ह्यातील नागरिकांना तीन बसेसमधून आपल्या मूळ गावी सोडण्यात आले.
लॉकडाऊननंतर राज्यातील कामधंदे सुरु होतील अशी लोकांना आशा होती. मात्र तसे न झाल्याने पिंपरी चिंचवडमध्ये कामानिमित्त आलेल्या लोकांची आपल्या स्वगृही जाण्यासाठी धावपळ सुरु झाली होती. आपल्या गावी जाण्यासाठी लोकांनी शासनाकडे विनंती अर्ज देखील केले. मात्र त्याला शासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परजिल्हयातील मात्र लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या लोकांची समस्या लक्षात घेवून पक्षनेते नामदेव ढाके यांनी पिंपरी चिंचवड महापालिका व पोलिस प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करुन तसेच शासनाने घालून दिलेल्या अटींचे पालन करुन जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा या जिल्हयात जाणाऱ्या लोकांसाठी तीन खाजगी बसेस उपलब्ध करुन दिल्या.
या सर्व बसेस सॅनिटायझिंग करण्यात आल्या. तसेच सर्व प्रवाशांना अत्यावश्यक मास्क वापराच्या सूचना देऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत प्रवाशांची बसमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली. एका बसमध्ये प्रत्येकी २२ प्रवासी अशा तीन बसेस १२ मे रोजी सकाळी सहा वाजता वाल्हेकरवाडी येथील चिंतामणी चौकातून सोडण्यात आल्या. सुमारे ५० दिवसांपासून लॉकडाऊनमुळे शहरात अडकलेल्या व आपल्या गावी जाण्याची आस लागलेल्या लोकांनी आपण आपल्या गावी जात असल्याचा आनंद व्यक्त करुन पोलिस प्रशासन व पक्षनेते नामदेव ढाके यांचे मनापासून आभार मानले. यासाठी पिंपरी चिंचवड मनपाचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, चिंचवड पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र जाधव व विश्वजीत खुळे व पोलिस कर्मचारी कांबळे यांचे विशेष सहकार्य लाभले.