- प्रशासनाचा अजब कारभार, स्थायी समितीकडून डोळे झाकून मंजुरी
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
कोरोना महामारीच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयात असलेल्या रूबी अलकेअर सर्व्हिसेस सुरू आहे. या खासगी वैद्यकीयसंस्थेचे सर्व डॉक्टर्स व वैद्यकीय मनुष्यबळ महापालिकेने वायसीएम कोरोना रूग्णालयासाठी घेतले आहेत. त्यापोटी महापालिका दरमहा 52 लाख 63 हजार रूपये त्या संस्थेला देणार आहे. प्रशासनाच्या या अजब प्रस्तावाला स्थायी समितीने डोळे झाक करून मंजुरी दिली आहे.
समितीच्या बुधवारी (दि.27) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. शहरातील नागरिकांना माफक दरात -हद्यरोगासंदर्भात उपचार मिळावेत म्हणून पालिकेने वायसीएममधील एका मजल्यावर खासगी रूग्णालयाचे रूबी अलकेअर सुरू केले आहे. दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात कोविडचे स्वातंत्र रुग्णालय असावे, असे शासनाचे आदेश होते.
सर्व अत्यावश्यक सेवा व यंत्रसामुग्री असल्याने पालिकेने वायसीएम रूग्णालय कोरोना रूग्णालय केले. रूग्णालयात असलेल्या रूबी अलकेअरमध्ये आयसीयूच्या 32 खाटा आहेत. तसेच, 228 डॉक्टर, परिचारिका व इतर अवैद्यकीय मनुष्यबळ आहे. सर्व व्यवस्था व मनुष्यबळासह पालिकेने 1 एप्रिल ते 5 ऑगस्टपर्यंत हे सेंटर ताब्यात घेतले आहे. तेथे कोरोना रूग्णावर उपचार केले जाणार आहेत. मनुष्यबळाच्या वेतनापोटी पालिका दरमहा 52 लाख 63 हजार रूपये खर्च करणार आहे.
वायसीएमची संपूर्ण इमारत पालिकेची आहे. भाडे करार स्थगित करून हे सेंटर ताब्यात घेता आले असते. मात्र, खासगी सेंटर सुरू राहावे, म्हणून हा निर्णय घेतल्याची शंका उपस्थित केली जात आहे. त्यावरून पालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे. त्याबाबत समिती अध्यक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांना योग्य उत्तरे देता आले नाहीत.