- प्राथमिक आरोग्य केंद्र पणदरे येथे विवीध कार्यक्रमांचे आयोजन
बारामती | निर्भीडसत्ता न्यूज
बारामती येथे राष्ट्रीय हिवताप प्रतिरोध मोहिम राबविण्यात येत आहे. एका महिन्याच्या या मोहिमेत हिवताप प्रतिबंधक उपाययोजना, जनजागृती, प्रबोधनपर कार्यक्रम राबवले जात आहेत. या दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी वेगवेगळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.
जून महिन्यात पावसाला सुरुवात होऊन अनेक ठिकाणी पाणी साठते व त्यामध्ये डासांच्या आळ्या व डास निर्मिती होऊन मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया अशा किटकजन्य आजारांचा फैलाव होतो. या कारणास्तव किटकजन्य आजारांचा फैलाव रोखण्यासाठी जिल्हा हिवताप अधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार संपुर्ण जून महिना हा हिवताप जनजागृती महिना म्हणून पूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. या अनुषंगाने बारामती येथील पणदरे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत १ जून ते ३० जून या कालावधीमध्ये हिवताप विरोधी मोहिमेस सुरुवात करण्यात आलेली आहे. यावेळी रांगोळीच्या माध्यमातून हिवताप डेंग्यू बाबत जनजागृती करण्यात आली आहे. या कार्यक्रमात आशा सेविकांनी उस्फुर्त प्रतिसाद नोंदविला होता. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.वैशाली अडकमोल यांनी हिवताप डेंग्यू बाबत मार्गदर्शन करीत कोरडा दिवस पाळण्याचे व किटकजन्य आजार होऊ नये यासाठी काेण-कोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात उत्कृष्ट रांगोळी काढणा-या अश्विनी गायकवाड, रेखा कांबळे, राणी जाधव, विद्या मोरे, बानुबाई कुंभार, शारदा रोकडे, अंजली खजिनदार तसेच आशा गतप्रवर्तक, गीता राजमाने या आशा सेविकांना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ.वैशाली अडकमोल, डॉ. चैतन्य एजगर, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तेजस्वी पोळ, आरोग्य सहायक बी.जी.कांबळे व पणदरेचे ग्रामसेवक संजयकुमार भोसले यांच्या हस्ते गौरवण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तेजस्वी पोळ, आरोग्य सहायक बी.जी.कांबळे यांनी केले होते”.