पिंपरी | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दुखरी राजकीय नस पकडून टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीत स्वतःच्या मुलाचा दारुण पराभव झाल्यामुळे अजित पवार पिंपरी-चिंचवड शहराकडे लक्ष देत नाहीत. अजित पवार जाणीवपूर्वक पिंपरी-चिंचवडकरांकडे लक्ष देत नाहीत, असे टीकास्त्र चंद्रकांत पाटील यांनी सोडले आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे. त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाच्या परिस्थितीत देशाला आणि देशाच्या जनतेला कुटुंब मानून आधार देत आहेत. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडबाबत नाराजीचा सूर आळवला आहे.
पुत्र पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीत पिंपरी-चिंचवड मतदारसंघातून दयनीय पराभव झाल्यामुळे अजित पवार त्या भागात फिरकले सुद्धा नाहीत. मुलाचा पराभव जिव्हारी लागल्याने पालकमंत्री असूनही त्यांनी शहरात केवळ एकदाच दौरा केला आहे. स्वार्थापोटी जनतेकडे दुर्लक्ष करणे हे एखाद्या मोठ्या मंत्रिपदावर असलेल्या नेत्याला शोभा देत नाही.