कानपूर : आठ पोलिसांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबे आज सकाळी चकमकीत मारला गेला आहे. त्याला उत्तर प्रदेश पोलिस कानपूरला घेऊन आले. मात्र कानपूरमध्ये येताच पोलिसांची गाडी रस्त्यावर पलटी झाली. यावेळी विकास दुबेने एका पोलिसांची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस आणि विकास दुबेदरम्यान जोरदार चकमक झाली. या चकमकीत विकास दुबेचा खात्मा झाला असल्याची माहिती आहे.
पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेला दुबे पोलिसांच्या फायरिंगमध्ये गंभीर जखमी झाला होता. माहितीनुसार विकास दुबेच्या कमरेत गोळी लागली होती. एक पोलिस देखील जखमी झाला होता. दोघांनाही जवळच्या हॉस्पिटलमध्ये भर्ती करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी दुबेला मृत घोषित केले.
कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेला काल अटक करण्यात आले होते. पोलिसांनी त्याला मध्यप्रदेशातील उज्जैनमधून अटक केली होती. माहितीनुसार उज्जैनच्या महाकाल मंदिरातून तो सरेंडर करणार असल्याची माहिती होती, मात्र त्याआधीच पोलिसांना ही माहिती मिळाली. मंदिरात बसलेल्या विकास दुबेला पोलिसांनी अटक केली. या अटकेचे सीसीटीव्ही फुटेजदेखील समोर आले होते.