पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सन 2019-20 या मागील वर्षांतील स्थापत्य विभागाच्या एकूण 690 विकासकामांची एकूण 208 कोटी 41 लाख रक्कमेची बिले ठेकेदारांना अदा करण्याच्या आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रस्तावाला स्थायी समितीने शुक्रवारी (दि.10) मंजुरी दिली. त्यामुळे बिले अदा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य शासनाच्या आदेशानुसार व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या स्थायी समिती सभेच्या अध्यक्षस्थानी संतोष लोंढे होते. मागील वर्षांतील झालेली कामांची बिले देण्याचा प्रस्ताव आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी बुधवार (दि.8)च्या सभेत ‘वन के’ खाली दाखल केला होता. त्यास समितीने आजच्या सभेत विनाचर्चा मंजुरी दिली. ही बिले जुनी असल्याने ती अदा करण्यास हरकत नसल्याचे आयुक्त व अध्यक्षांनी सांगितले.
शहरातील 10 हजार नागरीकांची सीबीसी, ईसीजी, विडाल, सीआरपी, तापमान इत्यादी कोरोनापूर्व तपासणीकरीता फिरती अद्ययावत प्रयोगशाळा असलेली बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी 40 लाख खर्चास मंजुरी देण्यात आली. मासुळकर कॉलनीतील नेत्र रुग्णालय इमारतीसाठी फर्निचर व्यवस्था करण्यासाठी 39 लाख 28 हजार खर्चास मान्यता देण्यात आली. कोरोनाबाधित रुग्ण उपचारादरम्यान मरण पावल्यास त्यासाठी योग्य ती खबरदारी घेऊन घेऊन मृतदेहावर अत्यंविधी करण्यासाठी 16 कर्मचारी 6 महिने कंत्राटी पद्धतीने नियुक्त केले आहेत. त्यासाठी 26 लाख 90 हजार खर्चास समितीने मान्यता दिली.
स्वच्छ पाणीपुरवठा करण्याचा सूचना
दूषित पाण्यामुळे शहरातील अनेक भागांतील नागरिकांना उलट्या, जुलाब व पोटदुखीचा त्रास होत आहे. त्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यावर अध्यक्ष संतोष लोंढे यांनी पाणीपुरवठा विभागास स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या सूचना दिल्या. आठवड्यातून दोन वेळा ‘वॉश आऊट’ करा. जुने पाईपलाईन बदला. गळती रोखा. योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सुचना दिल्या.