- डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी वायसीएममध्ये पोलिस तैनात करा
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना आजाराने थैमान घातलेले आहे. अशा परिस्थितीमध्ये महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयामध्ये येऊन भाजपचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप डॉक्टर व कर्मचार्यांनी केला आहे. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन महापौर उषा ढोरे, तसेच, भाजप व महापालिका पदाधिकार्यांनी संबंधित नगरसेवकाच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करा. तसेच, वायसीएम रूग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी पोलिस तैनात करण्याचा सूचना सोमवारी (दि.27) दिल्या आहेत.
डॉक्टर व कर्मचार्यांना नगरसेवकाकडून रविवारी (दि.26) शिवीगाळ झाल्याने रूग्णालयातील सर्व निवासी डॉक्टरांनी सोमवारी सकाळी रुग्णसेवा सोडून काम बंद करण्याचा पवित्रा घेतला. रूग्णालयाबाहेर येऊन काम बंद आंदोलन सुरू केले. त्यांची तातडीने दखल घेऊन भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे, माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी तातडीने वायसीएम रुग्णालयास भेट दिली.
आंदोलन करणार्या डॉक्टरांशी चर्चा करुन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तात्काळ पोलीस बंदोबस्त लावणार असल्याचे सांगून निवासी डॉक्टरांच्या समस्या त्वरीत मार्गी लागण्यासाठी आयुक्तांसोबत बैठक घेऊन सर्व प्रश्न सोडविण्याची ग्वाही दिली. त्याचप्रमाणे अशा प्रकारे कोणत्याही पक्षाचा नगरसेवक वा पदाधिकारी असो त्यांच्याकहून रुग्णालयामध्ये कोणताही गैरप्रकार घडल्यास त्याबाबत योग्य ती कारवाई केली जाईल, अशी ग्वाही डॉक्टरांना दिली. त्यानंतर डॉक्टरांनी समाधान व्यक्त करून आंदोलन मागे घेत कामास सुरुवात केली.
दरम्यान डॉक्टरांच्या प्रश्नासंदर्भात महापौर, पदाधिकारी, आयुक्त श्रावण हर्डीकर व अधिकार्यांसमवेत सायंकाळी तातडीने वायसीएम रुग्णालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये निवासी डॉक्टरांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर पोलीस तैनात करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या रात्रीचे वेळी अचानक उद्भवणार्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी एका जबाबदार वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्याची नेमणूक करण्याचा सूचना आयुक्तांना देण्यात आल्या.
डॉक्टरांनी मानधन वाढीबाबत मुद्दा उपस्थित केला होता. त्यानुषंगाने वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे मानधन 65 हजारांवरुन 75 हजार व कनिष्ठ निवासी डॉक्टरांचे मानधन 55 हजारांवरुन 65 हजार इतकी वाढ केली असल्याचे स्पष्ट केले. नगरसेवक व पदाधिकारी यांचे रुग्णासंदर्भातील समस्याचे निराकरण करण्यासाठी रुग्णालयामध्ये स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल असणार्या रुग्णांची माहिती दर्शविणारा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावण्याच्या सुचना करण्यात आल्या.
सद्यस्थितीत सर्वच रुग्णांलयावर कामाचा ताण असताना देखिल रुग्णालयातील नससच्या सर्वेक्षणासाठी नेमणूका केलेल्या आहेत. त्यांच्या ऐवजी आशा वर्करला प्रशिक्षित करुन या सर्वेक्षणाच्या कामासाठी त्यांची नेमणूक करण्यात यावी. उपलब्ध होणार्या नर्सेसच्या नेमणूका रुग्णालयामधील अतिदक्षता विभागामध्ये करण्यात याव्यात. कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता भोसरीतील बालनगरी व चिंचवड येथील ऑटो क्लस्टर येथे जम्बो रुग्णालय तयार करण्यात येत आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऑक्सिन व आयसीयु बेडची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.
डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत दोन्ही आमदार गंभीर
एखाद्या रुग्णास कोरोना संसर्ग झाल्यास त्याचे कुटुंबीय किंवा सख्खे नातेवाईकसुध्दा रुग्णाजवळ येत नाहीत. तथापि वायसीएम रुग्णालयातील डॉक्टर आपल्या जीवाची व कुटुंबाची पर्वा न करता रात्रंदिवस रुग्णालयात उपस्थित राहुन रुग्णसेवा करीत आहेत. त्यासाठी त्यांना प्रोत्साहित करुन त्यांचे मनोबल वाढवणे गरजेचे आहे. असे असताना नगरसेवकाकडून घडलेला प्रकार निंदनीय आहे. याबाबत आमदार महेश लांडगे व लक्ष्मण जगताप यांंनी डॉक्टरांना त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वेळीच दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले.