पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
वाकड-ताथवडे प्रभाग क्रमांक 25 मधील ताथवडे येथील जीवननगरकडून मुंबई महामार्गाकडे जाणार रस्ता विकसित करणे. प्रभागातील रस्ते कॉक्रीटकरणाचा विषय गुरूवारी (दि.27) झालेल्या स्थायी समिती सभेत सत्ताधारी भाजपने फेटाळून लावले. शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे व भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यातील वादामुळे हा विषय फेटाळण्यात आल्याची चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.
ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष संतोष लोंढे होते. रस्त्याचे सुमारे 51 कोटी खर्चाचे विषय मागील सभेत दोन आठवड्याकरीता तहकूब करण्यात आले होते. कोरोनाच्या काळात एकाच प्रभागात अधिक रक्कमेची कामे करणे योग्य नाही. कॉक्रीटऐवजी डांबरी रस्ते बांधा. त्यासाठी फेरनिविदा प्रक्रिया राबवा, अशी मागणी भाजपच्या सदस्यांनी केली. भाजपचे सदस्य शशिकांत कदम यांना विषय फेटाळण्याची सूचना केली. त्याला भाजपचे सदस्य अभिषेक बारणे यांनी अनुमोदन दिले.
शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांच्या प्रभागातील ही कामे आहे. हा विषय मंजुर करावा, अशी त्यांची मागणी होती. महापालिका प्रशासनाने जानेवारी व फेबु्रवारीत या कामांची रितसर निविदा प्रक्रिया राबविली आहे. त्यास मंजुरी द्यावी, असे ते म्हणाले. त्यावर मतदानांची मागणी त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 व शिवसेनेचे 1 असा 5 सदस्यांनी विषय मंजुरीसाठी मतदान केले तर, भाजपच्या 9 सदस्यांनी विषय फेटाळण्यासाठी मतदान केले. मतदानाद्वारे हे दोन्ही विषय सत्ताधारी भाजपकडून फेटाळण्यात आले. त्यानंतर लगेच सभा तहकूब करण्यात आली.