- चिंचवडच्या ऑटो क्लस्टर येथील कोरोना रूग्णालयाचे उद्घाटन
पिंपरी निर्भीडसत्ता न्यूज
नव्याने उभे करण्यात आलेल्या कोरोपा रुग्णालयामुळे शहरातील कोणताही रुग्ण आवश्यक उपचारांपासून वंचित राहणार नाही. महापालिकेने तत्परतेने अद्यावत सुविधा असलेले कोरोना रुग्णालय उभे केल्याने रुग्णांची गैरसोय दूर होण्यास मदत होणार आहे. नागरिकांनी कोरोना विषाणू संबंधित नियमांचे काटेकोर पालन केल्यास या आजाराला आटोक्यात ठेवणे सहज शक्य आहे, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (दि.28) चिंचवड येथील कार्यक्रमात व्यक्त केले. पालिकेतर्फे कोरोना बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑटो क्लस्टर येथे ऑक्सिजनयुक्त 200 खाटांचे कोरोना रुग्णालय उभारण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण अजित पवार व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे होत्या.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार लक्ष्मण जगताप, भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, माजी खासदार अमर साबळे, उपमहापौर तुषार हिंगे, पक्षनेते नामदेव ढाके, माजी सत्तारूढ पक्षनेते नगरसेवक एकनाथ पवार, विभागीय आयुक्त सौरव राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त श्रावण हर्डीकर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त सुहास दिवसे, अप्पर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ, स्मिता पाटील, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, आपण एकजुटीने लढल्यास कोरोना हद्दपार करणे शक्य होणार असून हीच कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली ठरेल. शहरामध्ये कोरोना चाचण्यांची संख्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या वाढलेली दिसून येते. कोरोना योद्धे जीवाची बाजी लावून रुग्ण सेवा करीत आहेत. नागरिकांनी मास्कचा वापर आणि फिजिकल डिस्टसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. काही खासगी रुग्णालयांकडून कोरोना रुग्णांची होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी लेखा परिक्षक व भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराचा रिकव्हरी रेट चांगला आहे. मृत्यू दर देखील नियंत्रणात असला तरी तो अधिक नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने काम करणे आवश्यक आहे. आपण सर्वांनी कोरोना विरुद्ध एकत्रितपणे लढा देणे आवश्यक आहे.
महापौर ढोरे म्हणाल्या की, सर्व सुविधा देणारे कोरोना रुग्णालय पालिकेने कमी दिवसांत उभे केले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटर सुविधा मिळणे आता शक्य होणार आहे. लॉकडाऊनच्या काळात पालिकेच्या वतीने गरजूंना मोठ्या प्रमाणावर मदत करण्यात आली. कोरोनामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण कमी राखण्यात पालिका यशस्वी झाली आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या व्यवस्थापनाची माहिती देणारी चित्रफित दाखविण्यात आली. सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी प्रास्ताविक केले. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आभार मानले. भाऊसाहेब कोकाटे यांनी सुत्रसंचालन केले.