पिंपरी | निर्भीड सत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढत असल्याची बाब चांगली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनाबाधित रुग्णांना तातडीने बेडस उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी गुरूवारी (दि.3) महापालिका प्रशासनाला दिल्या. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेमार्फत केलेल्या विविध उपायोजना व कामकाजाचा आढावा घेण्यासाठी आज खासदार शरद पवार यांनी महापालिकेस भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.
महापालिकेच्या कोरोना वॉर रूमला त्यांनी भेट दिली. महापौर उषा ढोरे व सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी त्यांचे पुस्तक भेट देऊन स्वागत केले. या वेळी यावेळी उपमहापौर तुषार हिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, माजी आमदार विलास लांडे, नेते आझम पानसरे, नगरसेवक योगेश बहल, राजू मिसाळ, डब्बू आसवानी, मयूर कलाटे, नगरसेविका मंगला कदम, वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, अजित पवार, प्रवीण तुपे, अतिरिक्त वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष अंबर चिंचवडे, नगरसेवक व अधिकारी आदी उपस्थित होते.
शरद पवार यांना आयुक्त हर्डीकर यांनी वॉर रूममार्फत सुरु असलेल्या कामकाजाची माहिती दिली. तसेच शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना आणि व्यवस्थापनाची माहिती दिली.
शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण, रुग्णवाहिकांची संख्या, शहरातील उपलब्ध खाटांची संख्या, कोरोना टेस्टिंग लॅब्सची माहिती, महापालिका तसेच खाजगी रुग्णालयात कोरोना संदर्भात असलेल्या सुविधांची माहिती, डॉक्टर्स व नर्सेसची उपलब्धता, कोरोना काळामध्ये शहरातील उद्योग कामगारांची घेत असलेली काळजी आदी विषयांबाबत शरद पवार यांनी माहिती घेतली.
शरद पवार यांच्याकडून 50 इंजेक्शन भेट
खासदार शरद पवार यांनी तब्बल 18 वर्षांनंतर महापालिकेस आज भेट दिली. या वेळी त्यांनी गरजू लोकांच्या उपचारासाठी 50 रेमडेसेवर इंजेक्शन महापालिकेच्या वायसीएम रूग्णालयासाठी भेट दिले. यापूर्वी त्यांनी 50 इंजेक्शन दिले होते. पुण्यात कोरोनामुळे एका पत्रकारांचा मृत्यू झाला. ती घटना दुर्देवी असल्याचे ते म्हणाले. पत्रकार तसेच, सर्वसामान्य नागरिकांचे कोरोनामुळे मृत्यू होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्षता घेण्याचा सूचना त्यांनी केल्या. तसेच, शासनाकडून सर्व ती मदत देण्याची ग्वाही दिली.